‘‘नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तीच्या विधानातील खोटेपणा लक्षात येऊनही त्यावरील आमचे मत मांडण्याची संधी आम्हाला आहेच कुठे? मात्र सोशल मीडियामुळे आम्हालाही आवाज मिळतो,’’ असे मत सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजच्या प्राध्यापिका मधू किश्वर यांनी व्यक्त केले. ‘सोशल मीडिया’वरील स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्रीय संरक्षणाशी तडजोड ठरते आहे का, अशी संकेतस्थळे म्हणजे माहितीचे लोकशाहीकरण करणारी केंद्रे आहेत की अराजक पसरविणारी, समांतर प्रसारमाध्यमांची भूमिका बजावणारी ही संकेतस्थळे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांचा ‘अजेंडा’ ठरवू लागली आहेत का, या आणि अशाच अनेक प्रश्नांचा ऊहापोह ‘रामनाथ गोएंका अ‍ॅवॉर्ड फॉर एक्सलन्स इन् जरनॅलिझम’ या पुरस्कार वितरणानंतर रंगलेल्या ‘सोशल मीडियाचे भय कोणाला?’ या विषयावरील चर्चासत्रात करण्यात आला.
‘सोशल मीडिया’वरील माहितीमुळे गेल्या वर्षी ईशान्य भारतात पेटलेले वातावरण, ‘फेसबुक’वर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे पालघरमधील दोन मुलींना झालेली अटक या आणि यांसारख्या घटनांमुळे हा विषय ऐरणीवर आला होता. त्यामुळेच या विषयावरील परिसंवादाचे आयोजन पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर करण्यात आले होते. सीएनएन-आयबीएन या वृत्तवाहिनीच्या सहसंपादिका सागरिका घोष आणि ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या सल्लागार संपादिका सीमा चिस्ती यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
परिसंवादात सहभागी झालेले राज्यसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी सोशल मीडियाची ताकद मान्य करताना या ताकदीला बेजबाबदारपणाची कृष्णकिनार असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मात्र त्याच वेळी ‘व्यवस्थेवर अंकुश ठेवणारे’ म्हणून या माध्यमाचा गौरवही केला.
एक्स्प्रेस समूहाच्या नव्या माध्यमांचे प्रमुख अनंत गोएंका यांनी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली येताना त्याच्या वापरकर्त्यांची आकडेवारी दुर्लक्षित केली जाऊ नये, असे आवाहन केले. मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या तुलनेत ही माध्यमे केवळ १० टक्के लोकांपर्यंतच पोहोचू शकतात, असे वास्तव त्यांनी लोकांसमोर आणले. इंटरनेट म्हणजे अराजकातील आशावादाचा उत्तम नमुना असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री मनीष तिवारी यांनी म्हटले. ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाचे मुख्य संपादक अरुण पुरी यांनी सोशल मीडिया ही पत्रकारांना जनतेची नस ओळखण्यास मदत करणारी आणि लोकांना नेमके काय हवे आहे हे सांगणारी यंत्रणा असल्याचे सांगितले. आज सोशल मीडियावरही काही प्रमाणात बंधने हवीतच, असे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.

सोशल मीडियाचे भय कोणाला?
‘द इंडियन एक्स्प्रेस’चे प्रमुख संपादक शेखर गुप्ता यांनी ‘अनामिकता लोकांमधील दानव पुढे आणते,’ असे सांगत सोशल मीडियाचे भय कोणाला, असा प्रश्न उपस्थितांना विचारला. व्यासपीठावरील तसेच श्रोत्यांमधील कोणीही हात वर करून प्रतिसाद न दिल्याने अखेर ‘सोशल मीडियाचे भय वाटते हे सांगण्याचीच भीती वाटत असावी,’ अशी कोपरखळी शेखर गुप्ता यांनी मारली.

‘सोशल मीडिया’मध्ये अस्मितांचे द्वैत संपविण्याची शक्ती –  सिब्बल
आजही आपल्याला ‘सोशल मीडिया’ची नेमकी ताकद कळली आहे, असे मला वाटत नाही. सगळ्या सीमारेषा पुसण्याची, काळाच्या मर्यादेवर मात करण्याची, अस्मितांचे द्वैत संपविण्याची क्षमता या माध्यमांत आहे, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, असे आग्रही मत केंद्रीय कायदा आणि माहिती-तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी मांडले. तहरीर चौकात एक हुकूमशाही राज्यव्यवस्था उलथवण्याची करामत याच माध्यमाने केली होती, असे सांगत या माध्यमाचा लोकशाहीवर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, असे कायदामंत्र्यांनी नमूद केले.

Story img Loader