फेसबुक, ट्विटर या समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) भारतात वाढत असलेला वापर आणि त्याचा वाढता प्रभाव यांमुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय मंडळीही या माध्यमाचा जास्तीतजास्त वापर करत आहेत. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी ही माध्यमे निर्णायक भूमिका बजावण्याचा दावा करण्यात आला आहे. इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि आयआरआयएस नॉलेज फॉउंडेशनने केलेल्या एका अभ्यासानुसार लोकसभेच्या ५४३ पैकी किमान १६० जागांच्या निकालांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.
फेसबुकने जाहिरातदारांच्या सोयीसाठी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली वापरकर्त्यांची आकडेवारी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडील मागील लोकसभा निवडणुकीच्या निकालांची माहिती आणि नव्या मतदार याद्या यांचा अभ्यास करून आयएएमएआय आणि आयआरआयएस फाउंडेशनने हा अहवाल तयार केला आहे. उच्च प्रभाव, मध्यम प्रभाव आणि कमी प्रभाव अशा स्वरूपांत मतदारसंघांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ज्या मतदारसंघातील फेसबुक वापरकर्त्यांची संख्या गेल्या वेळच्या निवडणुकीत विजयी मतांच्या फरकापेक्षा अधिक आहेत, असे मतदारसंघ उच्च प्रभाव या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच ज्या ठिकाणी १० टक्क्यांपेक्षा अधिक मतदार फेसबुकचे वापरकर्ते आहेत, त्यांचाही या गटात समावेश आहे. या वर्गात किमान १६० मतदारसंघांचा समावेश आहे. तर ज्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करणारी व्यक्ती अन्य एका व्यक्तीच्या मतांवर प्रभाव पाडू शकते, अशा मतदारसंघांना मध्यम प्रभाव गटात सामील करण्यात आले आहे. असे ६७ मतदारसंघ आढळून आले आहेत.
महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर
या अभ्यासानुसार महाराष्ट्राचे सर्वाधिक २१ मतदारसंघ सोशल मीडियाचा उच्च प्रभाव असलेल्या वर्गात समाविष्ट आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे यांसह उस्मानाबाद, चंद्रपूर, जालना या मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील ४८पैकी तब्बल ३० मतदारसंघांत सोशल मीडियाचा कमीअधिक प्रभाव जाणवेल, असे हा अहवाल सांगतो. महाराष्ट्राखालोखाल गुजरातमधील १७ मतदारसंघ उच्च प्रभाव वर्गात सामील करण्यात आले आहेत.
ठाण्यातील विजयाचा  ‘सोशल’ फंडा
ठाणे मतदारसंघात तब्बल ४ लाख २० हजारांपेक्षा अधिक मतदार फेसबुकचे वापरकर्ते आहेत. या ठिकाणी गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराने ५० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. ही आकडेवारी पाहता, ठाण्याचा विजयाचा मार्ग ‘सोशल मीडिया’तून जातो, असे दिसते.

मतदारांच्या मनात शिरण्याचा मार्ग..
* सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे राजकीय पक्ष आणि उमेवारही आपल्या प्रचारासाठी या माध्यमांचा वापर करत आहेत. यासाठी फेसबुकने वर्गीकृत केलेल्या माहितीचा आधार घेतला जातो. ही माहिती वय, ठिकाण, शिक्षण अशा प्रकारे वर्गीकृत केलेली असते. ही माहिती फेसबुक वापरकर्त्यांनीच दिलेली असते.
*  या माहितीच्या आधारे राजकीय पक्ष / उमेदवार मतदारांना आकर्षित करणारा मजकूर, छायाचित्रे पोस्ट करत असतात. या पोस्टना मिळणाऱ्या ‘लाइक’नुसार फेसबुकला पैसे दिले जातात. सध्या एका लाइकमागे २० पैशांपासून ५ रुपयांचा दर मोजला जातो. एकदा वापरकर्त्यांने लाइक केले की राजकीय पक्षांच्या सर्व जाहिराती, प्रचार आवाहने वापरकर्त्यांच्या फेसबुक पेजवरून प्रसारित केली जातात.

Story img Loader