समाजवादी पक्ष आणि त्याचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पाकिस्तानचे समर्थक असून मोहम्मद अली जिना यांचे भक्त आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केली. अखिलेश यांनी नुकतीच पाकिस्तान आणि जिना यांच्याबाबत टिपणी केली होती. त्याला उद्देशून योगी यांनी ही टीका केली. ट्वीट संदेशात आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ते (समाजवादी पक्ष, अखिलेश) जिना यांचे भक्त आहेत. आम्ही सरदार पटेल यांचे भक्त आहोत. त्यांना पाकिस्तान प्रिय आहे, तर आम्ही भारत मातेसाठी आपल्या प्राणांचा त्याग करू.
अन्य एका ट्वीटमध्ये आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, ज्या वेळी ते सत्तेत होते, त्यावेळी रामसेवकांवर गोळीबार करण्यात आला. कावड यात्रा रद्द करण्यात आल्या. सफाई महोत्सव असावा त्याप्रमाणे त्यांनी लूटले. आम्ही सत्तेवर आल्यावर रामलल्ला विराजमानचे स्वप्न साकार झाले. कावड यात्रेकरूंवर हेलिकॉप्टरवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. दीपोत्सव, रंगोत्सवासाठी उत्तर प्रदेश ओळखला जाऊ लागला.योगी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या राजवटीला उद्देशून वरील टीका केली. याआधी योगी यांनी राज्यातील लोकसंख्येतील धार्मिक समाजघटकांच्या प्रमाणावरून ८० टक्के विरुद्ध २० टक्के अशी टिप्पणी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल, तसतसे मतदारांचे ध्रुवीकरण घडविण्यासाठी नेत्यांकडून अधिकाधिक प्रयत्न केला जाईल, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.