श्रीहरीकोटा : २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी ‘चंद्रयान-३’ चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरविण्याच प्रयत्न केला जाईल, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॉफ्ट लँडिंग यान अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्टय़ा आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान-३ हे १ ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल, अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली.  २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ मिनिटांनी चंद्रयान-३ अलगद उतरविण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी एक वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्यात सुधारणा करण्यासाठी कोणती पावले उचलली पाहिजेत आणि काय चूक होऊ शकते याचा अभ्यास केला. त्या आधारावर पुनरावलोकन केले, असे ते म्हणाले.

प्रक्षेपण केंद्रावर पुस्तकाचे प्रकाशन

सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते-लेखक विनोद मानकारा यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘प्रिझम- द अ‍ॅन्सेस्ट्रल अ‍ॅबोड ऑफ रेनबो’ असे शीर्षक असलेल्या या पुस्तकात विज्ञानविषयक लेख आहेत. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस. उन्नीकृष्णन नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते.

चंद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण हा अंतराळ संशोधन क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यातून अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धता आणि अतूट बांधिलकी दिसून येते.

द्रौपदी  मुर्मू, राष्ट्रपती

चंद्रयान-३ हा भारताच्या अंतराळ प्रवासातील ‘नवा अध्याय’ असून यामुळे प्रत्येक भारतीयाची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. हा क्षण शास्त्रज्ञांच्या अथक समर्पणाचा पुरावा आहे. त्यांच्या ऊर्मीला आणि कल्पकतेला सलाम करतो!  – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

चंद्रयान-३चे यशस्वी प्रक्षेपण हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग या सर्व माजी पंतप्रधानांचा दृष्टिकोन, दूरदृष्टी, दृढ निश्चय,प्रयत्न यांचे फलित आहे.

मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष

चार वर्षांपूर्वी चंद्रावर यान अलगद उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर इस्रोने सुधारात्मक पावले उचलली आहेत. हे एक अतिशय महत्त्वाचे प्रक्षेपण असून भारताला या महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

के शिवन, इस्रोचे  माजी अध्यक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soft landing of chandrayaan on moon set for august 23 says isro chairman s somanath zws
Show comments