Tamil Nadu Soldier Murder : तमिळनाडूतल्या कृष्णगिरी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका ३३ वर्षीच भारतीय जवानाची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. कपडे धुण्यावरून झालेल्या वादातून द्रमुकचा (द्रविड मुन्नेत्र कळघम) नगरसेवक आणि त्याच्या अन्य साथीदारांनी भारतीय सैन्यदलातील जवानाची हत्या केली आहे. यावरून अण्णाद्रमुकने (अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम) द्रमुकविरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.
अण्णाद्रमुकचे प्रवक्ते कोवई साथ्यन म्हणाले की, भारतीय जवानाच्या हत्येच्या घटनेवरून एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे की, द्रमुख पक्ष सत्तेत असल्यावर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राहत नाही. एखाद्या सैन्य अधिकाऱ्याच्या हत्येपर्यंत यांची मजाल जाऊ शकते. अण्णाद्रमुक आणि इतर विरोधी पक्षांचा बदला घेण्यासाठी पोलिसांना हाताशी धरलं जात आहे.
प्रकरण काय?
पोलिसांनी सांगितलं की, कृष्णागिरीमध्ये भारतीय सैन्यदलातील जवान प्रभाकरन यांच्या हत्येच्या आरोपाखाली आम्ही द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी यांचा शोध घेत आहोत. ८ फेब्रुवारी रोजी पोचमपल्ली गावात प्रभाकरन यांचं चिन्नासामी यांच्याशी त्यांच्या घराजवळच्या पाण्याच्या टाकीवर कपडे धुण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर चिन्नासामी यांनी नऊ जणांना सोबत घेऊन त्याच दिवशी संध्याकाळी प्रभाकरन आणि त्यांचा भाऊ प्रभू या दोघांवर हल्ला केला होता.
हे ही वाचा >> विश्लेषण: शहरांची नावे बदलण्यासाठी केंद्राची मान्यता का लागते?
नगरसेवकाच्या मुलासह ६ जण अटकेत
पोलिसांनी सांगितलं की, प्रभू यांच्या तक्रारीनंतर कृष्णागिरी पोलिस ठाण्यात चिन्नासामी आणि त्यांचा मुलगा राजापंडी यांच्यासह ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राजापंडीसह ६ जणांना अटक केली आहे. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या प्रभाकरन यांचं रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झालं. पोलीस द्रमुकचे नगरसेवक चिन्नासामी यांचा तपास करत आहेत. चिन्नासामी मारहाणीच्या घटनेपासून फरार आहेत.