मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी थेट संबंध असल्याचा आरोप इंडोनेशियामध्ये अटक करण्यात आलेला कुख्यात डॉन छोटा राजन याने केला आहे. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले, असेही त्याने म्हटले आहे. छोटा राजनच्या या आरोपांमुळे मुंबई पोलीस दल अडचणीत येण्याची शक्यता आहे.
छोटा राजन सध्या बालीमध्ये असून, त्याला मंगळवारी भारतात आणण्यात येण्याची शक्यता आहे. बालीमध्ये तेथील पोलीसांच्या बंदोबस्तात असताना त्याने काही पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत मुंबई पोलीसांवर गंभीर आरोप केले. तो म्हणाला, मुंबई पोलीसांनी माझ्यावर आतापर्यंत खूप अत्याचार केले. केंद्र सरकारने यामध्ये लक्ष घातले पाहिजे. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचे थेट दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत. त्यामध्येही सरकारने लक्ष दिले पाहिजे. आपला सरकारवर विश्वास असल्याचे त्याने सांगितले.
माझे संपूर्ण आयुष्य मी दहशतवाद्यांविरोधात लढण्यात घालवले. त्यामुळे मी दाऊदला घाबरण्याचा प्रश्नच येत नाही. यापुढेही मी दहशतवादी आणि दाऊदशी लढा देतच राहिन, असेही त्याने म्हटले आहे. भारतात परत नेल्यावर सरकार मला जिथे ठेवेल. तिथे राहण्यास मी तयार आहे. केवळ मला न्याय मिळाला पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा असल्याचे त्याने सांगितले.

Story img Loader