काही लोक देशाचं विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिरस्काराचं राजकारण करत आहेत असं गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केला आहे. भाजपा देशाचं संविधान बदलण्याच्या प्रयत्नात आहे असाही आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. माझा प्राण गेला तरीही बेहत्तर मी देश दोन भागात वाटू देणार नाही. पश्चिम बंगालमध्ये NRC अर्थात राष्ट्रीय नागरिक पंजीकरण लागू होऊ देणार नाही असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांचा हा रोख सरळसरळ भाजपाकडे होता आणि केंद्र सरकारकडे होता यात शंकाच नाही. त्यांनी कुणाचंही नाव न घेता ही टीका केली आहे.
लोकशाही वाचवलीच पाहिजे
एवढंच नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातो आहे असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, एक वर्षात हे ठरवण्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहेत की आपल्या देशात कोण सत्तेवर राहिल? तुम्ही आज मला वचन द्या की आपण सगळे एकजूट करून देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या या शक्तींच्या विरोधात उभं राहू. लोकसभा निवडणुकीत आपण अशा शक्तींना देशाच्या सत्तेवरून खाली खेचणं हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे असंही ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. जर आपण लोकशाही वाचवण्यात अपयशी ठरलो तर सगळंच संपेल असंही ममता बॅनर्जींनी स्पष्ट केलं.
दोन दिवसांपूर्वी काय म्हटलं होतं ममता बॅनर्जींनी?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यानंतर मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला होता हे जर सिद्ध झालं तर मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. भाजपाचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी हा दावा केला होता की तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा देण्यात यावा म्हणून ममता बॅनर्जींनी अमित शाह यांना फोन केला होता. हा दावा खोडून काढत ममता बॅनर्जींनी थेट आव्हान दिलं आहे आणि आपण प्रसंगी राजीनामा द्यायलाही तयार आहोत असं म्हटलं आहे. ११ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस या पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता.
ममता बॅनर्जी असंही म्हणाल्या होत्या की लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० च्या पुढे जाता येणार नाही. तसंच आपल्या पक्षाचं नाव यापुढे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस असं असणार आहे असंही त्यांनी म्हटलं होतं.