देशाचा प्रजासत्ताक दिन(२६ जानेवारी) अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खलिस्तानी आणि अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनांकडून या महत्वाच्या दिवशी दहशतवादी हल्ला घडवला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलीस अधिकच सतर्क झाले असून, सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे.
या माहितीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून काही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर देखील जागोजागी लावण्यात आले आहेत. तसेच, संशयितांची शोधमोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. सध्या दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत, प्रजासत्ताक दिनी दहशतवादी कारवाई घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
We’ve inputs that some terrorist organisations including Khalistani outfits & Al-Qaeda may carry out unwanted activities (on Jan 26). Keeping this in mind, we have taken a few steps including putting up posters of wanted terrorists: Siddharth Jain, ACP Connaught Place, Delhi pic.twitter.com/0xVxyt7nAN
— ANI (@ANI) January 17, 2021
दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे पोलीस उपअधीक्षक सिद्धार्थ जैन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ”खलिस्तानी व अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनी गोंधळ निर्माण केल्या जाऊ शकतो, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यासह काही पावलं उचचली आहेत.”
दरवर्षीच दिल्लीत १५ ऑगस्ट व २६ जानेवारी सारख्या महत्वाच्या दिवशी सुरक्षा व्यवस्थांसमोर अनेक आव्हानं निर्माण होत असतात. दहशतवाद्यांकडून या महत्वाच्या दिवशी हल्ला घडवून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होत असतात. मात्र सुरक्षा व्यवस्था अधिकच सतर्क राहत असल्याने, त्यांना यामध्ये यश येत नाही. यंदा दहशतवादी संघटना शेतकरी आंदोलनाचा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.