‘सूड उगवणे’ या म्हणीला सार्थ ठरेल अशी घटना अहमदाबादमध्ये घडली आहे. नुकतेच बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर ‘बदला पुरा’ हे वाक्य अनेकांनी वापरले. राजकारण्यांनीही या वाक्याने बॅनर झळकवले. तर सूड घेण्यासंदर्भातली चित्रपटाला शोभेल अशी ही घटना अहमदाबाद कशी घडली, हे जाणून घेऊ. २२ वर्षांपूर्वी राजस्थानमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्याचा मुलगा आठ वर्षांचा होता. आता हा मुलगा ३० वर्षांचा झाला आणि त्याने आपल्या वडीलांच्या मारेकऱ्याला शोधून त्याचा त्याचप्रकारे खून केला. मात्र सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाल्यामुळे मारेकरी पोलिसांच्या हाती लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय?

मंगळवारी (१ ऑक्टोबर) सकाळी नखत सिंह भाटी (५०) याचा अहमदाबाद येथे अपघाती मृत्यू झाला होता. सुरक्षा रक्षकाचे काम करणारा भाटी सायकलवरून जात असताना मागून येणाऱ्या एका पिकअप ट्रकने त्याला धडक दिली, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. वरकरणी ही घटना अपघात असल्याचे दिसले. आरोपी गोपाळ सिंह भाटी याने नखत सिंहच्या सायकलला धडक देऊन पळ काढला होता. मात्र थोड्या अंतरावरच त्याला पोलिसांनी पकडले. निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला.

मात्र चौकशीत पुढे आढळले की, हा अपघात नसून नियोजनबद्ध केलेला खून आहे. पोलीस निरीक्षक एस.ए. गोहील यांनी सांगितले की, गोपाळचे वडील हरी सिंह भाटी यांचा राजस्थानच्या जैसलमेर येथे ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. हरी सिंह यांच्या हत्येप्रकरणी नखत आणि त्याच्या चार भावांना अटक होऊन सात वर्षांची शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मृत नखत सिंह भाटी अहमदाबादमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होता.

पोलिसांनी सांगितले की, गोपाळने वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी त्याच पद्धतीने नखत सिंहची हत्या केली. हत्येच्या एक आठवड्याआधी त्याने त्याच्या गावातून आठ लाखात पिकअप व्हॅन विकत घेतली. १.२५ लाखांची रोकड देऊन इतर बँकेकडून कर्ज घेऊन पैसे दिले होते. पोलिसांनी गोपाळच्या मोबाइल फोनचे मागच्या काही दिवसांतील नेटवर्क लोकेशन तपासले असता, तो मृत नखतच्या आसपास आढळून आला होता. याचा अर्थ त्याने हत्या करण्यासाठी योजना बनविली होती, असा संशय पोलिसांना आला.

पोलीस निरीक्षक गोहील यांनी सांगितले की, नखत सिंह आणि गोपाळचे वडील जैसलमेरच्या भागात राहणारे असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. नखत बडोदा तर गोपाळचे वडील अजासर गावात राहणारे आहेत. दोन्ही गावातील लोक एकमेकांशी बोलत नाहीत. दोन्ही गावातील लोकांमध्ये खूप काळापासून शत्रुत्व आहे. त्यांच्यात अनेकदा तडजोड करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात यश आलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son avenges fathers murder after 22 years killed killer in same way kvg