टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झालं. पण त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा त्यांचे कुटुंबीय करत आहेत. अशातच त्याच्या भावाने गोव्यात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोनालींचा भाऊ रिंकू ढाका यांनी काही लोकांवर सोनालीची हत्या केल्याचे आरोप केले आहेत.
हेही वाचा – “सोनालींच्या चेहऱ्यावर जखमा होत्या” पुतण्याचे आरोप; पोलिसांनी शवविच्छेदनाबद्दल घेतला महत्वाचा निर्णय
सोनाली फोगटच्या भावाने गोवा पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये त्याच्या बहिणीची तिच्या दोन साथीदारांनी हत्या केल्याचा दावा केला आहे. रिंकू ढाका यांनी आरोप केला आहे की तिच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी सोनाली फोगट तिची आई, बहीण आणि अन्य एका नातेवाईकाशी फोनवरून बोलली होती. त्यांच्याशी बोलताना चिंतातूर वाट होती आणि तिने तिच्या दोन साथीदारांविरुद्ध तक्रार केली होती. दरम्यान, सोनालीच्या मृत्यूनंतर हरियाणातील त्यांच्या फार्महाऊसमधील सीसीटीव्ही कॅमेरे, लॅपटॉप आणि इतर महत्त्वाच्या वस्तू गायब झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
रिंकू ढाका यांनी अंजुना पोलीस स्टेशनच्या बाहेर पत्रकारांना सांगितले, “सोनालीने आईशी बोलल्यानंतर आम्ही तिला त्या दोन जणांपासून दूर राहण्यास सांगितले होते. तसेच तिला दुसऱ्या दिवशी हिसारला परत जाण्यास सांगितले होते. मी तक्रार दिली आहे, पण पोलिसांनी त्या व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यास नकार दिला आहे. जर त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला गेला नाही तर आम्ही गोव्यात पोस्टमॉर्टम करू देणार नाही,” असंही ते म्हणाले.
हेही वाचा – सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”
“गेल्या १५ वर्षांपासून त्या भाजपाच्या नेत्या होत्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याची मागणी आम्ही पंतप्रधान मोदींकडे करणार आहोत,” असंही त्यांनी सांगितलं.