बिहारमधील प्रचारसभेत सोनियांचे मोदींवर टीकास्त्र
बिहार विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून त्याच्या निकालावरून राज्याचे आणि देशाचे भवितव्य निश्चित होईल, असे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला. मोदी हे ‘पॅकेजिंग’ आणि ‘रिपॅकिंग’ करण्यात वाकबगार आहेत, असे त्या म्हणाल्या.
भारत फुटीरतेच्या मार्गावर जाईल की सलोख्याच्या, याचा निर्णय बिहारचे मतदार ठरवतील, असे सोनिया गांधी म्हणाल्या. कहलगांव येथे एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. मोदी यांची १६ महिन्यांची राजवट देशासाठी हानीकारक असल्याची टीका त्यांनी केली.
देशापेक्षा परदेशातच अधिक वेळ काढल्याबद्दल मोदी यांच्यावर गांधी यांनी टीका केली. पूर्वीच्या सरकारच्या योजनाच त्यांनी नव्या आवरणात लपेटून सादर केल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानामुळे या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरला आहे त्याचाही उल्लेख गांधी यांनी केला. काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती, जमाती आणि अन्य मागासवर्गीयांना घटनेने दिलेल्या आरक्षणास बांधील आहे, असेही गांधी म्हणाल्या.