Sonia Gandhi Hospitalised: काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पोटाच्या आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या निवेदनानुसार, काल (गुरुवारी) सकाळी ८:३० वाजता त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. “सोनिया गांधी यांची नियमित तपासणी करण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना आता डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे,” असे वृत्त एएनआयने दिले आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबद्दल अधिक माहिती देताना, सर गंगा राम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, “पोटाच्या काही समस्येमुळे त्यांना आज (गुरुवारी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, काळजी करण्यासारखे काही नाही आणि उद्या सकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.”

डिसेंबर २०२४ मध्ये ७८ वर्षांच्या झालेल्या सोनिया गांधी गेल्या आठवड्यात राज्यसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान शेवटच्या सार्वजनिक ठिकाणी दिसल्या होत्या. संसदेच्या अधिवेशनादरम्यान, त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी जनगणना चार वर्षांपासून पुढे ढकलण्यात आली आहे, या वर्षीही ती होण्याची शक्यता कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. यावेळी त्यांनी असाही दावा केला होता की, देशातील जनता अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांपासून वंचित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांची प्रकृती आता ठीक आहे आणि आज (शुक्रवारी) सकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्येही सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच मार्च २०२४ मध्येही त्यांना सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कर्नाटकातील बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया गांधी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आजही सध्या राजकारणात खूप सक्रिय दिसत आहेत. अलिकडेच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपल्या मागण्या मांडल्या होत्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत त्यांनी केलेल्या विधानावरून बराच गदारोळ झाला होता. संसदेच्या संयुक्त अधिवेशनात एक तासाच्या भाषणानंतर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ‘गरीब आणि खूप थकल्यासारख्या’ असे वक्तव्य केले होते, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.