पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीवेळी दिलेली बहुतांश आश्वासने म्हणजे केवळ तोंडाची वाफ होती, असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर मंगळवारी टीका केली. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक नवी दिल्लीमध्ये बोलावण्यात आली आहे. या बैठकीतच सोनिया गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, गेल्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी दिलेली बहुतांश आश्वासने म्हणजे केवळ तोंडाची वाफ होती, असे दिसते आहे. हे सर्व बघून आम्हाला वाईट वाटते. शेजारील देशांमधील सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस आणखी ढासळते आहे. पाकिस्तानसोबत संबंध कसे ठेवावेत, यासंदर्भात सरकारची अवस्था गोंधळल्यासारखी आहे. यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. स्वतः नरेंद्र मोदी यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे गोंधळाच्या स्थितीत आणखीनच भर पडते आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करण्यासाठी इतिहासाची तोडमोड करून त्याचे पुनर्लेखन करण्याचा घाट घालण्यात येतो आहे, असा आरोप त्यांनी केला. अर्थव्यवस्थेचा विकासदर उतारावर असताना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. नोकऱयांची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन आणि मेक इन इंडिया घोषणा यासारख्या धोरणांबद्दल तर न बोललेच बरे, असेही सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Story img Loader