दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच प्रचारात उतरलेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला असला तरी कमी गर्दीची डोकेदुखी कायम आहे. सीलमपूर या ६० टक्केमुस्लीमबहुल मतदारसंघातील शास्त्री पार्कवर झालेल्या सोनिया गांधी यांच्या आजच्या सभेला साधारण २५ हजारांची गर्दी होती, परंतु पावणेदोन तास सभा उशिरा सुरू झाल्याने किमान १० हजार नागरिकांनी सोनिया गांधी येण्यापूर्वीच सभास्थानावरून काढता पाय घेतला होता.
    सीलमपूर भागात रोजंदारीवर उपजीविका चालविण्याऱ्यांची मोठी संख्या आहे. हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जातो. त्यामुळे सोनिया गांधी यांची पहिली सभा याच भागात ठेवण्यात आली. शास्त्री पार्क १५ एकर परिसरात पसरलेला आहे, त्यापैकी निम्म्या मैदानाची परवानगी प्रदेश काँग्रेसने प्रशासनाकडे मागितली होती. या सभेत सोनिया गांधी यांनी केवळ १४ मिनिटे भाषण केले. सभेची वेळ दुपारी दोनची होती. शास्त्री पार्कच्या परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दुपारी तीन ते चार या वेळेत आपले स्थान न सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सोनिया गांधी दुपारी तीननंतरच सभास्थानी येतील हे निश्चित होते. एक वाजल्यापासूनच सभास्थानी लोक जमत होते. सोनिया गांधी ३ वाजून ४६ मिनिटांनी व्यासपीठावर आल्या.
     लहान मुले, वृद्धांची लक्षणीय गर्दी सभेला होती. सभास्थानी आलेल्यांना लागलीच फूड पॅकेट्स देण्यात येत होते. पिण्याच्या पाण्याचे पाऊचदेखील मुबलक प्रमाणात वाटण्यात आले. आठवडाभरापूर्वी झालेल्या राहुल गांधी यांच्या सभेत गोंधळ झाला होता. तीन तास उशिरा आलेल्या राहुल यांचे भाषण होण्यापूर्वीच लोक उठून जाऊ लागले होते. अशी आपत्ती ओेढवू नये म्हणून शास्त्री पार्कवर फिरत्या प्रसाधनगृहांची व्यवस्था होती. राहुल यांच्या सभास्थानी ही व्यवस्था करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे शास्त्री पार्कला लागूनच किमान पन्नासेक एकरचे मैदान आहे. मैदानाचा वापर सभेसाठी वाहनतळ म्हणून करण्यात आला. सभास्थानी लोकांना घेऊन आलेल्या दोनशे मोठय़ा बसेस या वाहनतळावर उभ्या करण्यात आल्या होत्या.