काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे टीकास्त्र; रॉबर्ट वढेरांची पाठराखण
रॉबर्ट वढेरा यांची लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप फेटाळत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ कारस्थानाचा हा भाग आहे असून, नरेंद्र मोदी यांचे वर्तन शहेनशहासारखे आहे, अशा शब्दांत सोनिया गांधींनी मोदींवर तोफ डागली.
रायबरेली दौऱ्यावर असलेल्या सोनिया गांधी यांना पत्रकारांनी रॉबर्ट वढेरा यांच्यावरील आरोपाबाबत विचारले असता, त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. देशात मोठय़ा प्रमाणावर दारिद्रय़ असून, देश दुष्काळाचा सामना करीत आहे. शेतकरी संकटात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारची द्विवर्षपूर्ती साजरी करण्यात मश्गूल आहेत. आपण अशी स्थिती आधी कधीच पाहिली नव्हती, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
‘काँग्रेसमुक्त भारत’ कारस्थानाचा भाग म्हणून भाजप दररोज नवनवे निराधार आरोप करीत आहे. या आरोपांत तथ्य आहे असे वाटत असेल तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी. त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असे आव्हानही सोनिया गांधी यांनी दिले.
‘शहेनशहां’ना मतदारांनी पराभूत केले-भाजप
नवी दिल्ली : मतदारांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतच ‘शहेनशहां’ना पराभूत केले, अशा शब्दांत भाजपने सोनिया गांधींच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘शहेनशहां’सारखे वर्तन करणाऱ्यांना मतरांनी हिसका दाखविला आहे. तसेच हे ‘शहेनशहा’ नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामीनावर आहेत, असा पलटवार भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केला.
आम्ही एखाद्या प्रकरणाची चौकशी केली की आमच्यावर सुडाचे राजकारण करीत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून होतो, असे शर्मा म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानसेवक असल्याचे अनेकदा सांगितले होते, याकडेही शर्मा यांनी लक्ष वेधले. जे कॉंग्रेस करू शकली नाही ते भाजपने करून दाखविले, हे जनतेपुढे मांडण्यासाठी आणि सरकारचे यश जनतेसोबत साजरे करण्यासाठी द्विपर्षपूतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले, असेही शर्मा म्हणाले.
सिध्दार्थ नाथ सिंहांवर काँग्रेसचा आरोप
भाजप नेते सिध्दार्थ नाथ सिंह आणि शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी यांच्यात काय संबंध आहे, याबाबत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडे पत्राद्वारे केली आहे. सिध्दार्थ यांनी अगदी कमी कालावधीत भंडारी यांना ४५० वेळा फोन केल्याचा दावा पुनावाला यांनी केला. मात्र, भंडारी याच्याशी आपला आर्थिक संबंध नसून आपली त्यांच्याशी केवळ ओळख आहे, असे स्पष्टीकरण सिध्दार्थ नाथ सिंह यांनी केले.
प्रकरण काय आहे?
गेल्या महिन्यात शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारीच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला होता. रॉबर्ट वढेरा यांना लंडनमध्ये १९ कोटींची मालमत्ता खरेदी करून देण्यात भंडारीने सहकार्य केल्याचे तपासात पुढे आल्याचा दावा एका वृत्तपत्रात करण्यात आला आहे. हा आरोप वढेरा यांच्या वतीने त्यांच्या कंपनीने फेटाळून लावला. लंडनमध्ये वढेरा यांची स्वत.च्या नावे किंवा बेनामी कोणतीही मालमत्ता नसून, भंडारी याच्यासोबत कोणताही व्यावसायिक संबंध नसल्याचे वढेरा यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.