अयोध्येतील बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असून १६ जानेवारीपासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात होणार आहे. मंदिर समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून दिग्गज अभिनेते, कलाकार आणि क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांना या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवलं आहे. भाजपाचे नेते, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, संत-महंत आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनादेखील या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दरम्यान, काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं आहे.
काँग्रेसने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये काँग्रेसने म्हटलं आहे की, “आम्ही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारत आहोत.” काँग्रेसने निमंत्रण नाकारल्यामुळे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह कोणताही काँग्रेस नेता उपस्थित राहणार नाही.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, खासदार सोनिया गांधी आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. आपल्या देशातील कोट्यवधी लोक श्रीरामाची पूजा करतात. धर्म हा आपला खासगी विषय आहे. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी अपूर्ण मंदिराचं उद्घाटन करत आहेत. केवळ आगामी निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे.
काँग्रेसने म्हटलं आहे की, २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत दिलेल्या निकालाचा सन्मान करत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी यांनी आरएसएस/भाजपाच्या या कार्यक्रमाचं निमंत्रण सन्मानाने नाकारलं आहे.
विश्व हिंदू परिषदेची काँग्रेसवर टीका
दुसऱ्या बाजूला आज तकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे, विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला टोला लगावत प्रतिक्रिया दिली आहे, काँग्रेसला या कार्यक्रमाला यायचं नसेल तर ही त्यांची इच्छा आहे. आम्ही त्यांना निमंत्रण पाठवलं होतं. त्यांना यायचं नसेल तर काही हरकत नाही.
हे ही वाचा >> अयोध्या राम मंदिर: प्राणप्रतिष्ठा काय असते? काय सोहळा असतो आणि काय विधी असतात?
४,००० संतांना निमंत्रण
या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या पाहुण्यांच्या यादीत ४,००० संत आणि सुमारे २,५०० प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या यादीत हिंदू समाजातील सर्व घटकांना, विशेषत: उपेक्षितांना आणि पोटजातींनाही पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल याची काळजी घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.