लागोपाठ होणाऱ्या पराभवांमुळे एकीकडे काँग्रेस पक्षात निराशेचे वातावरण असतानाच आता पक्षाच्या चिंतेत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या आज उपचारांसाठी परदेशी रवाना होणार आहेत. यावेळी राहुल गांधीही त्यांच्यासोबत असतील अशी माहिती, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत तब्येत ढासळल्यामुळे सोनिया गांधी यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात उतरल्या नव्हत्या. निकालांच्या दिवशीही सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या पराभवाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. यादिवशीही सोनिया गांधी रुटीन चेकअपसाठी दिल्लीबाहेर होत्या. होळीनंतर त्या दिल्लीत परतल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, सोनिया गांधी तपासणीसाठी नक्की कुठे गेल्या होत्या, याची कोणालाही माहिती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असून त्यांच्या आजाराचे नेमके कारण माहित नाही.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात वाराणसीमधील प्रचारयात्रेदरम्यान त्रास होऊ लागल्यामुळे सोनिया गांधींना तातडीने रूग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर साधारण दोन महिने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र, त्यानंतर सातत्याने त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू आहेत. यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतही सोनिया यांना उपस्थित राहता आले नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांनी पक्षाच्या बैठकींनाही उपस्थित राहण्याचे टाळले होते.
Sonia Gandhi is travelling abroad for health check-up.Rahul Gandhi shall travel there&accompany her on the return journey: Randeep Surjewala pic.twitter.com/kmEPGC8Im0
— ANI (@ANI) March 16, 2017
Congress President,Smt. Sonia Gandhi, is traveling abroad for a health check-up. 1/2
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 16, 2017
Congress VP Shri Rahul Gandhi, shall travel there today to be with her and accompany Congress President on the return journey. 2/2
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 16, 2017
सोनिया गांधी या पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांनंतर आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चाही मध्यंतरी रंगली होती. आरोग्याच्या समस्यांमुळे त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’ला सांगितले होते. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर काँग्रेस पक्षात नेतृत्त्वबदलाची मागणी जोर धरताना दिसत आहे. त्यामुळे आता याबाबत कोणता निर्णय घेतला जाईल का, याची अनेकांना उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील पराभवामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर मोठ्याप्रमाणावर टीका होत आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला यश मिळाले असले तरी त्यांचे श्रेय सर्वस्वी कॅप्टन अमरिंदरसिंग यांना देण्यात आले आहे. तर मणिपूर आणि गोव्यामधील काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष नेतृत्त्वाच्या निष्क्रिय आणि पार्ट टाईम राजकारणाच्या वृत्तीवर नाराज असल्याची चर्चा आहे.