देशभरातील सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांकडून एका बाजूला लोकसभेसाठी मोर्चेबांधणी चालू असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीटीव्हीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सोनिया गांधी या सध्या उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या खासदार आहेत. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघातून प्रियांका गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात. राजस्थानमधील ३ जागांवर आणि हिमाचलमधील एका जागेवर राज्यसभेची निवडणूक होणार आहे. राजस्थानमधील दोन जागा भाजपाच्या खात्यात तर एक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचलमधील जागाही काँग्रेसच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनिया गांधी राजस्थान किंवा हिमाचलमधील जागेची निवड करू शकतात.
१३ राज्यातील ५६ राज्यसभा जागांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे. तर, उर्वरित दोन जागांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे. आंध्र प्रदेश ३, बिहार ६, छत्तीसगड १, गुजरात ४, हरयाणा १, हिमाचल प्रदेश १, कर्नाटक ४, मध्य प्रदेश ५, महाराष्ट्र ६, तेलंगणा ३, उत्तर प्रदेश १०, उत्तराखड १, पश्चिम बंगाल ५, ओडिसा २, राजस्थान ३ अशा एकूण ५६ जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत १० जागा काँग्रेसला मिळू शकतात.
हे ही वाचा >> महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात काँग्रेसला धक्का; मोठ्या पक्षाचा ‘इंडिया’ला रामराम, भाजपाशी युती
सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्या तर त्यांची कन्या आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या सोनिया गांधींच्या रायबरेली या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. प्रियांका गांधी गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राज्यभर काँग्रेसचा प्रचार केला होता. तसेच राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रियांका गांधी मेहनत घेत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधीसाठी त्यांच्या रायबरेली मतदारसंघात प्रचार केला होता.