काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आई पावोलो मायनो (वय ९०) यांचे शनिवारी २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या इटलीमधील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्वीट करुन पावोलो मायनो यांच्या निधनाची माहिती दिली. “सोनिया गांधी यांची आई पावोलो मायनो यांचे इटलीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले,” असं ट्वीट रमेश यांनी केलं होतं. सोनिया गांधींना मातृशोक झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरुन पावोलो मायनो यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पावोलो मायनो यांच्या निधनाची बातमी समजल्याने दु:ख झालं. माझ्या सहवेदना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असं राष्ट्रपती मूर्मू यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. कधीही न भरुन येणारी ही हानी सहन करण्याची शक्त देव त्यांना देवो, असंही मूर्मू यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवरुन सोनिया गांधीं यांच्यासाठी शोकसंदेश देताना संपूर्ण गांधी कुटुंबियांसोबत आपल्या सहवेदना असल्याचं म्हटलं आहे. “सोनिया गांधी यांच्या आई पावोलो मायनो यांचं निधन झाल्याचं समजलं. माझ्या शोकसंवेदना सोनिया गांधींसोबत आहेत. पावोलो मायनो यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खद प्रसंगी माझ्या सहवेदना संपूर्ण कुटुंबासोबत आहेत,” असं पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं आहे.

सोनिया गांधी या उपचारांसाठी परदेशात आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुलगी तसेच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रयंका गांधीही आहेत. मागील आठवड्यामध्ये गांधी कुटुंबीय परदेशात गेले तेव्हा काँग्रेसकडून सोनिया गांधींच्या आरोग्यविषयक चाचण्यांसाठी हा दौरा असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी गांधी कुटुंबीय सोनिया गांधींच्या मातोश्रींची इटली येथील घरी जाऊन भेट घेतील असंही सांगण्यात आलेलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonia gandhi mother paola maino passes away president murmu pm modi and others offer condolences scsg