उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पक्षावर जोरदा टीका केली जात आहे. अनेकांनी तर काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नामुष्कीजनक पराभवावर रविवारी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात पाच राज्यांमधल्या निकालंवर चर्चा केली जाणार आहे. दुसरीकडे जी-२३ गटानं देखील पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत गांधी कुटुंबीय राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यासंदर्भात आता थेट काँग्रेस पक्षाकडूनच स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर यावर जोरदार चर्चा सुरू झाली. हा सगळा प्रकार व्हायरल झाल्यानंतर खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.

काँग्रेसनं वृत्ताबाबत व्यक्त केली नाराजी

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात खुलासा केला आहे. “वृत्तवाहिनीवर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. सत्ताधारी भाजपामुळे व्हायरल करण्यात आलेल्या चर्चेवर विसंबून हे वृत्त दाखवण्यात आलं आहे”, असं ट्वीट रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.

पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव

दरम्यान, सुरजेवाला यांचं ट्वीट तुफान व्हायरल झालं असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत झालेल्या मतदानाचे निकाल १० मार्च रोजी लागले. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये भाजपानं एकहाती सत्ता मिळवली आहे. गोव्यामध्ये भाजपानं अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना धोबीपछाड देत आपनं बाजी मारली आहे.