पाच राज्यांमध्ये निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्याचा काँग्रेस नेतृत्वाने चांगलाच धसका घेतल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळेच पहिल्यांदाच काँग्रेसच्या नेतृत्वाने बंडखोर जी २३ नेत्यांच्या गटाशी चर्चा केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांनी जी-२३ गटातील नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा केलीय. लवकरच सोनिया गांधी काँग्रेसमधील महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत असतानाच जी-२३ गटातील नेत्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये सोनिया यांना आपलं म्हणणं सांगितलं आहे. या पुढील पक्षाची वाटचाल सकारात्मक असावी यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सर्व स्तरांवर एकत्रितपणे आणि सर्वांचा विचार करुन निर्णय घेण्यात आले पाहिजे, हाच आहे जी-२३ नेत्यांनी संगितलंय.
इतर नेतेही उपस्थित…
बुधवारी रात्री गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी जी-२३ मधील काही महत्वाचे भेटले होते. मणी शंकर अय्यर, लोकसभेच्या खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर आणि २०१७ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले गुजरातचे नेते शंकर सिन्हा वाघेला. वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला मात्र मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादीलाही सोडचिठ्ठी दिली. त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा असल्याच्या बातम्या यापूर्वी अनेकदा समोर आल्यात.
जी-२३ ने जारी केलं पत्रक…
पहिल्यांदाच जी -२३ मधील नेत्यांनी बैठकीसंदर्भातील अधिकृत पत्रक जारी केलंय. या पत्रकारवर बैठकीला उपस्थित असणाऱ्या १८ नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. “आम्ही काँग्रेसचे सदस्य असणारे नेते नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी भेटलो होतो. आम्हाला असा विश्वास आहे की काँग्रेसला पुढे घेऊ जाण्याचा एकमेव मार्ग हा सर्व समावेशक आणि सामाहिक नेतृत्वाचा आहे. सर्व स्तरावर अशाच पद्धतीने निर्णय घेतले गेले पाहिजेत,” असं या नेत्यांनी पत्रकात म्हटलंय.
…तरच २०२४ मध्ये…
“भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेसला मजबूत करणं महत्वाचं आहे. काँग्रेसने समविचारी पक्षांसोबत चर्चा करण्यास सुरुवात करावी. असं केल्यास २०२४ मध्ये एक विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करुन देण्याचा मार्ग निवडता येईल,” असं या नेत्यांनी पत्रकात म्हटलंय.
कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या?
गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, शशी थरूर, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी, अखिलेश प्रताप सिंह, राज बब्बर, पी. जे. कुरियन, रेणुका चौधरी, संदीप दीक्षित आणि विवेक तन्खा, कुलदीप शर्मा, एम. ए. खान या नेत्यांबरोबरच एकूण १८ नेत्यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे.

काँग्रेसमधील जी-२३ गट नेमका काय आहे?
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आले. मात्र, पक्षाची कोणतीही अधिकृत जबाबदारी न स्वीकारता राहुल गांधी हेच पक्षाचे सर्व निर्णय घेत आहेत. गांधी कुटुंबाच्या पक्ष संघटना चालवण्याच्या पद्धतीला पक्षांतर्गत विरोध होऊ लागला. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पक्ष संघटनेमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. जिल्हा स्तरापासून केंद्रीय स्तरापर्यंत नेतृत्वबदल करावा लागेल. त्यासाठी संघटनात्मक निवडणुका घेतल्या पाहिजेत. पूर्ण वेळ कार्यरत राहणारे, कार्यकर्त्यांना भेटणारे नेतृत्व म्हणजेच पक्षाध्यक्ष असला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली. गांधी कुटुंबियांविरोधातील हा सूर जाहीरपणे आळवणाऱ्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांच्या बंडखोर गटाला ‘जी-२३’ म्हटले जाऊ लागले. २३ बंडखोर नेत्यांनी ऑगस्ट २०२०मध्ये सोनिया गांधी यांना पक्ष नेतृत्व व संघटनेतील बदलासंदर्भातील मागणी करणारे पत्र पाठवले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये गांधी निष्ठावान व बंडखोर असा वाद वाढत गेला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर तो विकोपाला गेला आहे.