नवी दिल्ली : खोटे आणि द्वेषाचे समर्थक असलेल्यांना नकार देऊन सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मतदान करा, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी चित्रवाणी संदेशाद्वारे केले. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सदस्य लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
देशात युवकांमधील बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांमध्ये भेदभाव आदींनी अभूतपूर्व पातळी गाठली आहे. ही आव्हाने पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि भाजपच्या नियत (हेतू) आणि नीती (धोरण) आदींमुळे उद्भवल्याचा आरोप सोनिया गांधींनी केला. सर्वसमावेशकता आणि संवाद नाकारून सत्ता स्थापन करणे, हेच त्यांचे लक्ष्य असल्याचा दावाही गांधी यांनी केला. काँग्रेसला साथ देऊन सर्वांसाठी शांतता आणि सौहार्द असलेला एक मजबूत, अधिक एकसंध भारत निर्माण करू या, असेही गांधी यांनी चित्रवाणी संदेशात म्हटले आहे.
हेही वाचा >>> हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात; तीन अपक्षांकडून पाठिंबा मागे
एकसंध देशाचे उद्दिष्ट
‘देशाची राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आहे. देशातील गोरगरीब जनता मागेच राहिली असून, समाजाची जडणघडण होत नाही. ही वस्तुस्थिती विदारक आहे. मी आज तुम्हाला पुन्हा एकदा पाठिंबा देण्याची विनंती करत आहे. देश एकत्र ठेवणे, गोरगरीब, तरुण, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित समुदायांसाठी काम करणे, हे आमच्या ‘न्याय पत्र’ आणि ‘गॅरंटी’चे उद्दिष्ट आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशाची लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.