नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ महाआघाडीला सोबत घेऊन पुढे जाण्याची क्षमता फक्त काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंमध्ये असल्याचा निर्वाळा काँग्रेसेतर नेत्यांनी बुधवारी दिला. त्यामुळे विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीचे नेतृत्व खरगेंच्या हाती अधिकृतपणे दिले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करणाऱ्या खरगेंनी निवडणुकीच्या राजकारणातही पन्नास वर्षांची सक्रिय वाटचाल केली आहे. त्यांच्या वैयक्तिक तसेच राजकीय संघर्षाचा विस्तृत पट मांडणाऱ्या ‘मल्लिकार्जुन खरगे : पॉलिटिकल एन्गेजमेंट विथ कम्पॅशन, जस्टिस अँड इन्क्लिसिव्ह डेव्हल्पमेंट’ या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात व ‘पीपल्स पोस्ट’चे संपादक-पत्रकार चेतन शिंदे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

हेही वाचा >>>राज्यपालांसाठी मार्गदर्शक सूचनांबाबत चाचपणी; विधेयकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आणखी स्पष्टतेचे संकेत

‘तेलंगणमध्ये काँग्रेस आणि माकपमध्ये जागावाटपात मतभेद झाले पण, खरगेंमुळे काँग्रेस व माकपमध्ये शत्रुत्व निर्माण झाले नाही’, अशी दाद माकपचे महासचिव सीताराम येचुरी यांनी दिली. ‘इंडिया’च्या घटक पक्षांना एकत्र ठेवण्याची क्षमता खरगेंमध्ये असल्याचे ‘द्रमूक’चे टी. आर. बालू म्हणाले. ‘खरगे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यामुळे विरोधकांना ताकद मिळाली.’, असा मुद्दा राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांनी मांडला.

Story img Loader