माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अलाहाबादला आल्या होत्या. या कार्यक्रमात सोनिया गांधींचे भाषण सुरू असताना अजानला सुरुवात झाली. अजानला सुरुवात होताच सोनिया गांधींनी त्यांचे भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर सोनिया गांधींनी पुन्हा त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रादेखील उपस्थित होते.
[jwplayer WH6ZUMPe-1o30kmL6]
‘इंदिरा गांधींना नेहमीच देशाला भक्कम स्थितीत कसे न्यायचे, याची चिंता असायची. जिथे सर्व सुरक्षित असतील, असा देश त्यांना बनवायचा होता. आपल्या सर्वांना पुढे जाण्याची संधी मिळावी, असा देश इंदिरा गांधींना हवा होता. सर्वांना अभिमान वाटेल, अशा देशाची निर्मिती हे इंदिरा गांधींचे स्वप्न होते,’ अशा शब्दांमध्ये सोनिया गांधींनी इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
[jwplayer WLYGke2j-1o30kmL6]
‘दोन दिवसांपासून आपण इंदिरा गांधींचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करायला सुरुवात केली. या कार्यक्रमात इंदिरा गांधींच्या आयुष्याशी संबंधित छायाचित्रे आहेत. शताब्दी वर्षादरम्यान हे प्रदर्शन अन्य ठिकाणीदेखील नेण्यात येईल. याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या बालपणीचा काळ व्यतीत केला. याच ठिकाणी स्वातंत्र्याच्या लढ्यातील अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. याच ठिकाणी त्यांचा विवाह संपन्न झाला. त्यांना देशासाठी प्राण गमावल्यावर याच ठिकाणी त्यांचे पार्थिव आणण्यात आले,’ अशा शब्दांमध्ये सोनिया गांधींनी इंदिरा गांधीच्या आठवणींना उजाळा दिला.