राजस्थानमध्ये मागील दोन दिवस झालेल्या राजकीय नाट्यानंतर दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा केल्या. यानंतर सोनिया गांधींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत राज्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय दिल्लीतून पाठवलेल्या निरिक्षकांना सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निर्णयामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर असलेले अशोक गेहलोत या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज करणार असल्याने आणि काँग्रेसने एक व्यक्ती, एक पद हो धोरण जाहीर केल्याने राजस्थान मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाची निश्चिती होणार होती. मात्र, याविरोधात गेहलोत समर्थक ८० आमदारांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याने राजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्यावर सोनिया गांधींनी हा निर्णय घेतला.

हेही वाचा : गेहलोत यांच्या अप्रत्यक्ष ‘बंडा’मुळे गांधी कुटुंब अडचणीत

विशेष म्हणजे या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे आणि अजय माकन यांची राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यातआली. मात्र, गेहलोत समर्थक मंत्री शांतीकुमार धारीवाल यांनी त्यांच्यावरही गंभीर आरोप केले. अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यासाठी पायलट गटाकडून सुरू असलेल्या षडयंत्रात अजय माकन यांचाही समावेश असल्याचा आरोप धारीवाल यांनी केला.