काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात त्या सहभागी झाल्या होत्या. या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील करोनाची चाचणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना काल संध्याकाळी अर्थात बुधवारी सौम्य ताप आला होता. त्यामुळे करोनाची लक्षणं दिसत असल्याचं लक्षात येताच त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यानंतर सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ताप आल्यानंतर सोनिया गांधी तातडीने लखनौहून दिल्लीत परतल्या असल्याचं सांगितलं जात आहे.
बुधवारीच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. सोनिया गांधींना ८ जून रोजी चौकशीसाठी पाचारण करण्यात आलं आहे. नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र, आता सोनिया गांधींना करोनाची लागण झाल्यामुळे ही चौकशी होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.