काँग्रेसच्या माजी अध्यक्षा व विद्यमान खासदार सोनिया गांधी आज राजस्थानमधील जयपूर येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे व राहुल गांधी उपस्थित असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजस्थानमधील काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी सोनिया गांधी राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व करतील, ही राजस्थानसाठी अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ANI वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. सोनिया गांधी या सध्या रायबरेलीच्या खासदार आहेत. पाच वेळा त्या लोकसभेच्या सदस्या राहिल्या. आता राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी आज सोनिया गांधी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
हेही वाचा : ‘मुंबईत आलात तर सर्वजण मारले जाल’ इंडिगो विमानात टिश्यू पेपरवर धमकीचा संदेश!
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे राजस्थानमधूनच राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात कोणत्या काँग्रेस नेत्याला उमेदवारी मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.