पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (१९ सप्टेंबर) लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत सर्व पक्षांच्या खासदारांनी चर्चा केली. या विधेयकाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांनी भाषण केलं. या भाषणावेळी सोनिया गांधी यांनी विधेयकात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी महिलांच्या आरक्षणाची व्यवस्था केली जावी अशी मागणी केली. तसेच किती वर्षांमध्ये या विधेयकाची अंमलबजावणी होईल असा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान, भाजपा खासदार निशिकांत दुबे सोनिया गांधी यांना उत्तर देत म्हणाले, तुम्ही (काँग्रेस) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना अरक्षण दिलं तेव्हा ओबीसींचा विचार केला का? तुम्ही याआधी कधी ओबीसींबद्दल बोलला नाहीत. त्यावेळी तुम्ही यात (घटनादुरुस्ती केली तेव्हा) ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नमूद केला असता तर आज ही वेळ आली नसती. इतक्या वर्षात तुम्हाला ओबीसी दिसले नाहीत.
निशिकांत दुबे म्हणाले, अध्यक्ष महोदय, आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. या गोष्टी अनेक वर्षांपासून माझ्या मनात आहेत. मी आज त्या गोष्टी या सभागृहाला सांगणार आहे. मी २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार झालो. त्यानंतर दोन वर्षांनी या सभागृहात मला दोन मोठ्या घटना पाहायला मिळाल्या. यातली पहिली घटना २०११ ची आहे तर दुसरी २०१३ मधली आहे. या दोन वर्षांमध्ये या सभागृहात दोन भयंकर घटना घडल्या. या दोन्ही घटना महिला आरक्षण विधेयकाशी संबधित आहेत म्हणून मी सांगतोय.
भाजपा खासदार निशिकांत दुबे म्हणाले, हे महिला अरक्षण विधेयक २०१० मध्ये लोकसभेत पारित झालं आणि २०११ मध्ये लागू केलं जाणार होतं. परंतु हे काँग्रेसवाले ते विधेयक लागू करणार नव्हते. २०११ मध्ये या सभागृहात हे विधेयक आणलं. त्यावेळी यांच्याच मित्रपक्षांमधील खासदारांना काँग्रेच्या खासदारांनी याच संसदेत फटकावलं. दोन विधेयकं तेव्हा पटलावर होती. २०११ मध्ये हेच महिला आरक्षणाचं विधेयक होतं तर २०१३ मध्ये पदोन्नतीतलं आरक्षण विधेयक पटलावर होतं. मी आत्ता ती घटना सांगितल्यावर या सभागृहातील सगळे सदस्य उभे राहतील.
भाजपा नेते निशिकांत दुबे म्हणाले, याच संसदेत घडलेली घटना आहे. खासदार व्ही. नारायण स्वामी हे विधेयक सादर करत होते. तेव्हा समाजवादी पार्टीचे खासदार यशवीर सिंह उभे राहिले. ते अनुसूचित जातीमधले होते. हे काँग्रेसवाले आज जरी अनुसूचित जातीबद्दल बोलत असले तरी तेव्हा यांनी काय व्यवहार केला होता ते पाहा. व्ही. नारायण स्वामी विधेयक वाचत असताना यशवीर सिंह तिथे गेले आणि त्यांनी ते विधेयक खेचलं. तेव्हा याच सभागृहात यशवीर सिंह यांची कॉलर पकडायला कोण आलं माहितीय? या सोनिया गांधी यशवीर सिंह यांची कॉलर पकडायला आल्या होत्या.
हे ही वाचा >> “महिला आरक्षण विधेयकाला आमचा पाठिंबा, पण…”, सोनिया गांधींनी लोकसभेत मांडली काँग्रेसची भूमिका
निशिकांत दुबे म्हणाले, ही घटना घडली तेव्हा तिथे जवळच खासदार नीरज शेखर उभे होते, मुलायमसिंह यादव बाहेर गेले होते. तेव्हा मी टेबलवरून उडी मारून आलो आणि त्यांना (सोनिया गांधी) म्हणालो, तुम्ही इथल्या हुकूमशाह नाही, तुम्ही इथल्या राणी नाही, तुम्ही या सभागृहात हाणामारी करू शकत नाही. पण तरीदेखील यांच्या लोकांनी त्या खासदारांना चोपलं. या घटनेनंतर त्यावेळी मुलायमसिंह यादव म्हणाले होते की भाजपाचे लोक तिथे नसते तर आमचे खासदार वाचले नसते. तुम्ही (काँग्रेस) तर खासदारांची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.