छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे विधान केले. या विधानानंतर सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार का? असे विचारले जात होते. यावरच आता काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी अधिक माहिती दिली आहे. सोनिया गांधी राजकारणातून निवृत्त होणार नाहीत, असे अल्का लांबा म्हणाल्या आहेत.
सोनिया गांधी यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला नाही
काँग्रेस अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या प्रवक्त्या अल्का लांबा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोनिय गांधी यांच्या विधाविषयी सविस्तर माहिती दिली. माध्यमांनी सोनिया गांधी यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढू नये. मी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आगामी काळातही मी हा निर्णय घेणार नाही, असे सोनिया गांधी यांनी सांगितले आहे, अशी माहिती अल्का लांबा यांनी दिली.
सोनिया गांधी काय म्हणाल्या होत्या?
माझ्या प्रवासाचा समारोप…
सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचेही यावेळी संकेत दिले होते. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली
सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. “भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.