काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याची आणि प्रियांका गांधी यांना आगामी निवडणुका फूलपूर मतदारसंघातून लढविण्याची विनंती करणारी होर्डिग्ज लावल्याने उत्तर प्रदेश काँग्रेसने बुधवारी दोघा पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले.
अलाहाबादच्या सिव्हिल लाइन्स परिसरात लावलेल्या होर्डिग्जवर पक्षाचे सचिव हसीब अहमद आणि श्रीशचंद दुबे यांची नावेही असल्याने उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष निर्मल खत्री यांनी त्यांना पक्षातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
पक्षाशी संबंधित नसलेल्यांकडून असे प्रकार केले जात असून सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्याच्या वावडय़ा उठविल्या जात आहेत त्याची पक्षाने गंभीर दखल घेतली असून गरज भासल्यास त्यांच्याविरुद्ध खटलाही दाखल केला जाईल, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
सोनिया गांधी यांची प्रकृती ठणठणीत असून त्या सक्षमपणे पक्षाची धुरा वाहत आहेत, असे असतानाही काही जणांनी त्यांची आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नाही, राहुल गांधी यांच्यावर अधिक ताण पडत आहे त्यामुळे प्रियांका गांधी-वडेरा यांनी पुढील निवडणूक फूलपूर मतदारसंघातून लढवून पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होण्यास मदत करावी, असे अलाहाबादमदील होर्डिग्जवर लिहिण्यात आले आहे.