काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ने कर्नाटकातून आंध्रप्रदेश राज्यात प्रवेश केला आहे. अलिकडेच ‘भारत जोडो यात्रे’ने १००० किलोमीटरचा टप्पा पार केला होता. या पदयात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी सर्वसामान्य नागरिकांशी भेटत असून, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यातच आता राहुल गांधींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधींशी विविध विषयांवरून अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारल्या आहेत.

यावेळी फावल्या वेळात काय करता? असा सवाल राहुल गांधींना विचारण्यात आला. त्यावर “यात्रेतून मिळालेल्या वेळेत व्यायम करतो. पुस्तके वाचतो. आई, बहिण आणि मित्रांबरोबर फोनवरून गप्पा मारतो. आईला विचारतो ती काय करत आहे,” असं राहुल गांधींनी म्हटलं.

एका कार्यकर्त्याने विचारले की तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग ( त्वचेवरील काळसरपणा ) दिसत नाही, कोणत्या सनस्क्रीनचा वापर करता?, त्यावर राहुल गांधींनी टी-शर्ट बाजूला करत हातावरील टॅनिंग दाखवलं. “यासाठी आईने सनस्क्रीन पाठवलं आहे, पण वापरत नाही,” असं उत्तर त्यांनी हसत दिलं आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी अयोध्येत दिवाळी साजरी करण्याची शक्यता

दरम्यान, सोमवारी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, राहुल गांधी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांसह ९५०० प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत देशात ९६ टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर, महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसच्या ९६ टक्के आणि मुंबई काँग्रेसच्या ९७ टक्के प्रतिनिधींनी मतदान केलं आहे.

Story img Loader