फोर्बस् या नियतकालिकाने जाहीर केलेल्या ताज्या मानांकनांनुसार जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पहिल्या २० जणांमध्ये समावेश करण्यात आला आहे; तर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी सलग दुसऱ्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे.
सात अब्ज लोकसंख्या असलेल्या या जगाला आकार देणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने ‘चालविणाऱ्या’ प्रभावशाली ७१ व्यक्तींची यादी फोर्बस् या नियतकालिकाने जाहीर केली. राष्ट्रप्रमुख, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योजक आणि परोपकारी व्यक्ती यांचा या यादीमध्ये समावेश आहे. यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या यादीमध्ये १२वे स्थान मिळवले असले तरी त्यांची गतवर्षीच्या तुलनेत एका स्थानाने घसरण झाली आहे. भारताचे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा या यादीत २० क्रमांक आहे. मात्र भारताच्या आर्थिक सुधारणांच्या या शिल्पकाराचा संयमी बुद्धिवाद हा अलीकडे बुजरेपणा म्हणून पाहिला जात आहे, असे मत फोर्बस्ने नोंदविले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या यादीत ३७ वे स्थान पटकाविले आहे. रिलायन्स कंपनी ही भारताची सर्वात मौल्यवान कंपनी असून अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचे मत नियतकालिकाने व्यक्त केले आहे. आर्सेलर मित्तलचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल हे या यादीत ४७ व्या क्रमांकावर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा