वैज्ञानिकांनी अतिशय वेगळी अशी बोलणारी सिगरेट्सची पाकिटे तयार केली आहेत, त्यात धूम्रपान सोडण्यास उत्तेजन देणारे ध्वनिमुद्रित संदेश आहेत, त्यामुळे तुम्ही सिगरेट शिलगावण्यापूर्वीच तुम्हाला धोक्याचा इशारा दिला जातो. स्टर्लिग विद्यापीठाच्या तंबाखू नियंत्रण केंद्राने ही बोलणारी सिगरेटची पाकिटे तयार केली असून, त्यात वेगवेगळे संदेश धूम्रपान करणाऱ्यांसाठी आहेत.
एका पाकिटातून असा संदेश ऐकू येतो, ज्यात तुम्हाला धूम्रपान सोडण्यासाठी समुपदेशन करणाऱ्या संस्थेचा फोन क्रमांक सांगितला जातो. दुसऱ्या एका सिगरेट पाकिटातून जर तुम्ही धूम्रपान केले तर तुमची पुनरुत्पादनक्षमता कमी होते हा संदेश ऐकवला जातो, असे ‘द मिरर’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.
गाणारी वाढदिवस कार्डे असतात. त्यात जे तंत्र वापरलेले असते तेच यात वापरले आहे. ही शुभेच्छा कार्डे उघडताच त्यातून शुभेच्छा संदेश ऐकू येतो. येथे सिगरेटचे पाकीट तुम्ही उघडायला गेलात तर त्यातून तुम्हाला धूम्रपान कसे वाईट आहे हे सांगणारा संदेश दिला जातो. सिगरेट कंपन्या आकर्षक वेष्टने तयार करून ग्राहकांचे लक्ष वेधून घेत असतात, पण आता वैज्ञानिकांनी त्यापासूनच प्रेरणा घेऊन जरा ग्राहकांच्या हितगोष्टी करण्यास सुरुवात केली आहे. धूम्रपानाची सवय लोकांनी सोडावी यासाठी या युक्तीचा उपयोग होऊ शकतो किंवा नाही याची चाचपणी यात केली जात आहे.
यातील एक संशोधक क्राफर्ड मुडी यांनी सांगितले, की आगामी काळात सिगरेटची अशी पाकिटे शक्य आहेत, ज्यात संगीत वाजेल किंवा ती बोलू शकतील, त्यामुळे धूम्रपानाला आळा घालण्याचा हेतू साध्य होईल अशी अपेक्षा आहे.

Story img Loader