इंग्लंडच्या डेव्होटेक इंडस्ट्रीजने जगातील सर्वात छोटा आपत्कालीन फोन चार्जर तयार केला असून त्याचा आकार १.३ इंच इतका आहे. चावीच्या रिंगमध्येही तो सहजपणे बाळगता येतो. गिझमॅगने दिलेल्या वृत्तानुसार ‘किकस्टार्टर’ नावाच्या संकेतस्थळावर या चार्जरची छबीही झळकली असून तो ०.९ इंच रूंद व ०.५ इंच जाडीचा आहे. मायक्रो फ्युएल चार्जर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चार्जरचा वापर बहुतांश कंपन्यांच्या फोन चार्जिगसाठी करता येतो. मायक्रो यूएसबी पोर्ट असेच त्याचे स्वरूप आहे. तो अॅल्युमिनियमचा बनवलेला आहे व चांगला मजबूत आहे, तरीही त्याचे वजन फारच कमी आहे, असा दावा कंपनीने संकेतस्थळावर केला आहे. यात लिथियम आयन रिचार्जेबल बॅटरी वापरलेली असून त्यामुळे २०-३० मिनिटांचा अवांतर टॉक टाइम मिळतो तसेच काहीतास तो स्टॅंडबाय मोडवर राहू शकतो. कुठला फोन वापरायचा आहे त्यावर हे अवलंबून आहे. महिनाभर किंवा तीन महिने हा चार्जर चार्ज राहू शकतो, त्याला पॉवर स्विच असून त्यामुळे विनाकारण होणारे डिसचार्जिग टळते.
वेगळे काय? सध्या आपल्याकडे बॅटरी केसेस, बॅटरी पॅक्स, सोलर चार्जर व इतर अनेक प्रकारचे चार्जर आहेत, पण त्यांचे वैगुण्य आहे ते म्हणजे त्यांचा आकार व वजन फ्युएल फोन चार्जर हे तुमच्या कारच्या चावीसारखे बाळगता येतात. हा चार्जर छोटय़ा गॅस कॅनिस्टरसारखा दिसतो. त्यात २२० मिलीअँपीयरची बॅटरी आहे. या फोनला एक मायक्रो यूएसबी पोर्ट आहे ते चार्जिगसाठी वापरतात व एका पोर्टला तुम्ही तुमचा फोन जोडू शकता. कुठलाही फोन त्याला लावता येतो, फक्त आयफोनसाठी अॅडॉप्टर गरजेचा असतो. त्याची किंमत २० डॉलर असणार आहे.