न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या कोठडीत वाढ केली आहे. ईडी (अंमलबजावणी संचालनालय)ने हेमंत सोरेन यांच्या व्हॉट्सॲप चॅटशी संबंधित पुरावे न्यायालयात सादर केले. यानंतर न्यायालयाने कोठडीची मुदत वाढविण्याचा निर्णय दिला आहे. हेमंत सोरेन यांचे हे व्हॉट्सॲप चॅट त्यांचे जवळचे सहकारी विनोद सिंग यांच्याशी झालेल्या संभाषणाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या चॅटसंदर्भात हेमंत सोरेन यांना प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
हेमंत सोरेन यांची पाच दिवसांची कोठडी बुधवारी संपली, त्यानंतर ईडीने त्यांना रांची येथे दिनेश राय यांच्या विशेष न्यायालयात हजर केले. पीएमएलए कोर्टाने ईडीला पाच दिवसांची कोठडी दिली. ८.५ एकर जमिनीच्या कथित आरोपावरून हेमंत सोरेन यांना ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती.
हेमंत सोरेनच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये काय आहे?
माहितीनुसार, हेमंत सोरेन यांच्या व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गुपिते ईडीला सापडली. हेमंत सोरेन कोठडीत असताना ईडीने त्यांना हे चॅट दाखवून प्रश्नोत्तरे विचारल्याचे सांगण्यात आले आहे. चॅटमध्ये अत्यंत आक्षेपार्ह पुरावे सापडल्याचं म्हटलं जातंय. या चॅटमध्ये अनेक मालमत्तांशी संबंधित गोपनीय माहितीची देवाणघेवाण झाल्याचे ईडीने सांगितले. यासोबतच बदली-पोस्टिंग आणि सरकारी नोंदीही शेअर केल्या आहेत. मोठ्या रकमेसंदर्भातील व्यवहारही या चॅटमध्ये आढळले आहेत.
ईडीने आपल्या रिमांड नोटमध्ये न्यायालयाला सांगितले की, “व्हॉट्सॲप चॅटमध्ये केवळ अनेक मालमत्तांशी संबंधित गोपनीय माहितीची देवाणघेवाणच झाली नाही तर ट्रान्सफर पोस्टिंग, सरकारी रेकॉर्ड शेअर करणे इत्यादींशी संबंधित इतर माहिती शेअर करण्यात आली. या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांची बदली पोस्टिंग, झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांची अनेक प्रवेशपत्रे ताब्यात घेणे आणि शेअर करणे इत्यादी संबंधात इतर अनेक व्यक्तींशी WhatsApp चॅट्स आहेत.
ईडीने विशेष न्यायाधीश दिनेश राय यांच्या न्यायालयात सांगितले की, सोरेन यांच्या विरुद्धचा तपास रांचीमधील ८.५ एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्याशी संबंधित इतरही अनेक मालमत्ता आहेत. तसंच, हेमंत सोरने तपास कार्यात सहकार्य करत नसल्याचंही ईडीने न्यायालयात म्हटलं.