फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री ठप्प झाल्याने त्यांचे भारतासह जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते अस्वस्थ झाल्याचं पहायला मिळालं. इंटरनेटवर ग्लोबल आऊटरेज म्हणजेच जागतिक स्तरावर खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेच्या तब्बल सहा तासांनंतर तिन्ही सेवा हळूहळू पुन्हा रुळावर येत आहेत. एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. असं असतानाच या तिन्ही सेवा पुरवणाऱ्या फेसबुक कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्गनेही या सर्व गोंधळावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> सहा तासांत झुकरबर्गला झालेल्या आर्थिक नुकसानीचा आकडा पाहून थक्क व्हाल; श्रीमंतांच्या यादीतही घसरलं स्थान

ट्विटरवरील व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत हॅण्डलवरुन वापरकर्त्यांची माफी मागण्यात आलीय. आज अनेकांना आमची सेवा वापरण्यात अडचणी त्यासाठी आम्ही क्षमस्व आहोत. व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा हळूहळू आणि काळजीपूर्वक पद्धतीने सुरु करण्याचं काम आम्ही करत आहोत. तुम्ही दाखवलेल्या धैर्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. यासंदर्भात आम्हाला अधिक माहिती मिळाल्यास आम्ही ती तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू, असं कंपनीने म्हटलं आहे.

तर मार्क झुकरबर्गनेही सेवा पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलीय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजर सेवा पुन्हा ऑनलाइन उपलब्ध आहेत. आज या सेवा पुरवण्यात आलेल्या अडथळ्यासाठी सॉरी. मला ठाऊक आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत संपर्कात राहण्यासाठी आमच्या सेवांवर किती अवलंबून आहात, असं मार्कने म्हटलं आहे.

तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉटअ‍ॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा खंडित झाल्याचं सांगण्यात आलं. तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सेवेत व्यत्यय आल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनीने नेमके कारण मात्र उघड केलेले नाही. ‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला. नवे संदेश मिळत नसल्याची तक्रार लाखो वापरकर्त्यांनी केली.

काही लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा मिळत नसल्याची आम्हाला कल्पना आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले. ट्विटर सेवेतही अडथळे येत असल्याची तक्रार वापरकत्र्यांनी केली. समाजमाध्यमांची सेवा ठप्प झाल्याने वापरकर्ते हैराण झाल्याचं पहायला मिळालं. याचा परिणाम फेसबुकच्या शेअर्सवरही झाला. नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच फेसबुकचे शेअर्समध्ये मोठ्याप्रमाणात घसरण झालीय. फेसबुकचा शेअर ४.९ टक्क्यांनी घसरला.

Story img Loader