मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला काँग्रेसने खासदारकी दिल्यानंतर भाजपनेही आता नवी खेळी केली आहे.  भारताचा माजी कर्णधार, निवृत्त क्रिकेटपटू सौरव गांगुली याला भाजपने खासदारकीची ऑफर दिली आहे. ही ऑफर स्वीकारायची की नाही, याचा निर्णय गांगुलीने अद्याप घेतलेला नाही.
भाजपच्‍या या ऑफर मागे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शक्‍कल असल्‍याचे बोलले जात आहे. पश्चिम बंगालमध्ये स्पोर्टस आयकॉन असलेल्या गांगुलीला भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्रीपद देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. गांगुलीनेही हा प्रस्‍ताव मिळाल्‍याचे मान्‍य केले. तो म्‍हणाला, मला तसा प्रस्‍ताव मिळाला आहे. परंतु, मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. इतर कामांमध्‍ये मी व्‍यस्‍त आहे. यासंदर्भात लवकरच माहिती देईन, असे गांगुलीने सांगितले.
सौरव गांगुली आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार वरुण गांधी या दोघांशी चांगली मैत्री असलेली एक व्यक्ती अलिकडेच राजकीय वर्तुळात खूप सक्रिय झाली होती. याच व्यक्तीमार्फत सौरव गांगुली आणि खासदार वरुण गांधी यांची नोव्हेंबर महिन्यात भेट झाली होती. या भेटीत भाजपकडून गांगुलीला खासदारकीची ऑफर देण्यात आली असल्याचे समजते. वरुण गांधी सध्या पश्चिम बंगालमध्ये भाजपचे निरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये पक्षाने नेमकी काय तयारी करावी आणि कोणाला तिकीट द्यावे, यासंदर्भातले धोरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत ते महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

Story img Loader