आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमिक्रॉन’या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित म्हणजेच नवीन व्हेरिएंटच्या विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र एकीकडे यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे एक दिलासादायक बातमी समोर आलीय. ‘ओमिक्रॉन’या विषाणूबद्दल सर्वात आधी इशारा देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन महिला डॉक्टरने या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्यास अगदी सौम्य प्रमाणामध्ये लक्षणं दिसून येत असल्याचं म्हटलंय. तसेच या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या संशयीत रुग्णांपैकी अनेकजण हे रुग्णालयामध्ये दाखल न होताच ठणठणीत बरे झाल्याचं या महिला डॉक्टरने म्हटलंय. तसेच या विषाणूबद्दल फारशी माहिती अद्याप उपलब्ध नसताना त्यासंदर्भातील वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्यासंदर्भातील नाराजीही व्यक्त करण्यात आलीय.
नक्की वाचा >> दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत परतलेल्या व्यक्तीला ‘ओमिक्रॉन’ करोनाचा संसर्ग? चाचणीसाठी पाठवण्यात आले नमुने
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुख असणाऱ्या अँजलीक कोइ्टझी यांनी असोसिएट फ्री फ्रेसला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मागील १० दिवसांमध्ये ३० असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांच्या करोना चाचणीचे निकाल सकारात्मक आलेत. पण त्यांच्यामधील लक्षणं ही वेगळी होती, असं अँजलीक सांगतात. “थकवा आल्याने हे रुग्ण दवाखान्यामध्ये आले होते,” असं अँजलीक म्हणाल्या. सामान्यपणे तरुण रुग्णामध्ये हा असा प्रकार दिसून येत नसल्याचं सांगताना त्यांनी यापैकी बरेचसे रुग्ण हे चाळीशीच्या आतील होते, अशी माहिती दिली. तसेच यापैकी अनेकांचे अर्धे लसीकरण पूर्ण झाले होते, असंही अँजलीक यांनी स्पष्ट केलं.
‘ओमिक्रॉन’च्या संक्षयित रुग्णांमध्ये स्नायू दुखी, घशातील खवखव, कोरडा खोकला अशी सौम्य स्वरुपाची लक्षण दिसत होती. अगदी फार कमी रुग्णांना ताप आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. पूर्वीच्या करोना व्हेरिएंटच्या संसर्गामध्ये ही लक्षणं दिसून येत नव्हती. त्या करोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणं आणि त्याचा होणारा त्रास हा अधिक होता.
अँजलीक यांनी ‘ओमिक्रॉन’संदर्भात आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना इशारा देताना, या नवीन विषाणूची तांत्रिक जडणघडण ही डेल्टाप्रमाणे नाहीय, असं म्हटलंय. ‘ओमिक्रॉन’हा सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला करोनाचा नवा व्हेरिएंट असून त्यामध्ये म्युटेशन म्हणजेच सातत्याने होणारे रचनात्मक बदल हे अधिक असल्याचं सांगण्यात आलंय. अँजलीक यांच्याकडे चाचणीसाठी आलेल्या ३० पैकी ७ रुग्णांना याचा संसर्ग झाल्याचं १८ नोव्हेंबर रोजी स्पष्ट झालेलं. दक्षिण आफ्रिकेच्या संशोधकांना हा व्हेरिएंट आधीच कळला होता. त्याला त्यांनी बी. १.१.५२९ असं नाव दिलं होतं. यासंदर्भातील घोषणा २५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. या नवीन घोषणेमुळे जगभरामध्ये पुन्हा करोनाची चर्चा सुरु झाली असून दक्षिण आफ्रिकेबरोबरच आफ्रिकेतील इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय काही देशांनी घेतलाय. या संदर्भात दक्षिण आफ्रिका सरकारने नाराजी व्यक्त करत घाई गडबडीत असे निर्णय घेतले जात असल्याचं म्हटलंय.
‘ओमिक्रॉन’संदर्भात फारशी माहिती नसतानाही तो फार भयानक असल्याचं आणि त्यामध्ये बरेच म्युटेशन होत असल्याचे दावे केलत जात असून हे दूर्देवी असल्याचं मत अँजलीक यांनी व्यक्त केलंय.
“या विषाणूमुळे परिणाम होणार नाहीय असं आम्ही म्हणत नाही. पण ज्यांनी लस घेतली नाही त्यांनाही अगदी सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. तसेच मला विश्वास आहे की युरोपातील अनेकांना या विषाणूचा संसर्ग होऊन गेला असेल,” असंही अँजलीक म्हणाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेबरोबर बोस्वाना आणि हाँगकाँगमध्ये या नवीन करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ऑस्ट्रेलिया, इटली, युके, बेल्जियम आणि कॅनडामध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची माहिती समोर आलीय.