वर्णद्वेषाविरोधात निकराचा लढा देऊन जगाच्या इतिहासात अजरामर झालेले दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत नेते नेल्सन मंडेला यांना रविवारी त्यांच्या मूळ गावी असंख्य चाहते, त्यांचा परिवार आणि मित्रांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. मंडेला यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मंडेला यांचे गेल्या ५ डिसेंबर रोजी ९५व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.
मंडेला यांच्या शवपेटीचे त्यांच्या कौटुंबिक दफनभूमीत पारंपरिक पद्धतीने दफन करण्यात आले आणि ‘राजकीय कैदी ते दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष’ अशा एका प्रदीर्घ प्रवासाची इतिश्री झाली. मंडेला यांना लष्करी इतमामाने निरोप देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या दूरचित्रवाणीवरून मंडेला यांच्या शवपेटीचे दर्शन जनतेस घडविण्यात आले, परंतु मंडेला यांची शवपेटी प्रत्यक्षात दफनासाठी नेण्यात आली, त्या वेळी मात्र त्या दृश्याचे चित्रीकरण रोखण्यात आले. मंडेला यांचे निधन झाल्यानंतर १० दिवसांचा सरकारी दुखवटा पाळण्यात आला होता. त्यांच्या दफनविधीनंतर रविवारी हा दुखवटा संपुष्टात आला.
मंडेला यांच्या मूळ गावी वाहतुकीच्या मर्यादित सोयीसुविधा असल्यामुळे केवळ साडेचार हजार लोकांनाच तेथे येण्याची अनुमती देण्यात आली होती.
गरिबी, बेरोजगारी, अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, हिंसाचार, गुन्हेगारी अशा अनेक समस्यांनी सध्या दक्षिण आफ्रिकेस वेढले असून मंडेला यांच्या तत्त्वांचे आचरण करून या समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन अध्यक्ष जेकब झुमा यांनी या वेळी केले. दक्षिण आफ्रिका सातत्याने प्रगतिपथावर राहील, असे आश्वासन तुम्हास देऊ इच्छितो, असे झुमा पुढे म्हणाले.
मंडेला यांच्या अंत्यसंस्कारांसाठी अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा