सोल : दक्षिण कोरियात शनिवारी हॅलोविन साजरा करण्यासाठी अरुंद रस्त्यावर जमलेल्या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५१ झाली आहे. दुर्घटनाग्रस्तांत बहुसंख्य किशोरवयीन आणि विशीतील तरुणांचा समावेश आहे. हे सर्व जण येथील इतवॉन मार्गावर ‘हॅलोविन’ साजरा करण्यासाठी जमले होते. मृतांमध्ये १९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. जगभरातील नेते-राष्ट्रप्रमुखांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना पाहणाऱ्यांनी सांगितले, की या रस्त्यावरील चिंचोळय़ा गल्लीत गर्दी आणि वाहनांची दाटीवाटी झाली होती. येथील हॅमिल्टन हॉटेलजवळील गल्लीपर्यंत आपत्कालीन मदत पथक आणि रुग्णवाहिका पोहोचणे अशक्य झाले. त्यामुळे मृतांची संख्या वाढली. ८२ जखमींपैकी १९ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> गुजरातमध्ये झुलता पूल नदीत कोसळला, मृतांचा आकडा ६० वर, अनेकजण जखमी

सोल शहर प्रशासनातर्फे सांगण्यात आले, की शनिवारी मध्यरात्रीपर्यंत दोन हजारांहून अधिक नागरिकांनी नजीकच्या हन्नम-डोंगमधील शहर कार्यालयात दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. आपले नातलग संपर्कात नसल्याची त्यांची तक्रार होती. या दुर्घटनेत ते मृत अथवा जखमी झाले असावेत या भीतीने प्रशासनाकडे ते चौकशी करीत होते.

मृतांमध्ये १९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे, असे सेऊलच्या योंगसान अग्निशमन विभागाचे प्रमुख चोई सेओंग-बीओम यांनी सांगितले. मात्र, ते नेमके कोणकोणत्या देशांचे नागरिक आहे, हे अद्याप समजू शकले नाही. 

हेही वाचा >>> Landslide: जम्मू काश्मीरातील जलविद्युत प्रकल्पात दरड कोसळली; चौघांचा मृत्यू, सहाजण जखमी

भारताचा शोकसंदेश

नवी दिल्ली : भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रविवारी दक्षिण कोरियामध्ये चेंगराचेंगरीत झालेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. या दु:खद प्रसंगी भारत दक्षिण कोरियासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ‘ट्वीट’ केले, की सोलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत इतक्या तरुणांचा मृत्यू झाल्याने खूप धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याविषयी सहसंवेदना प्रकट करतो. आम्ही दक्षिण कोरिया प्रजासत्ताकाच्या दु:खात सहभागी आहोत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korea halloween stampede death toll in south korean stampede rises to 151 zws