South Korea Plane Crash : दक्षिण कोरियात रविवारी एक विमान क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. विमान लँडिंग करताना क्रॅश झाल्याने विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात तब्बल १७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे. हे विमान लँडिंग दरम्यान धावपट्टीवरून अचानक घसरलं. त्यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचं व्हिडीओत दिसत आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, या विमानात १८१ जण प्रवास करत होते. त्यापैकी १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण कोरियातील मुआन (Muan International Airport) आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा अपघात झाला आहे. विमानतळाच्या सीमेवरील एका काँक्रीटच्या कुंपणाला विमान आदळल्यानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. या घटनेमुळे मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा गोंधळ उडाला. विमानाला आग लागल्यानंतर धुराचे मोठे लोट पसरले होते. या घटनेत तब्बल १७९ जणांचा मृत्यू झाला असून या अपघातात विमानातील दोन व्यक्तींशिवाय इतर सर्वांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, असं अधिकाऱ्यांच्या माहितीवरून इंडिया टुडेनी हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा : काश्मिरात हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत;विमान रेल्वेसेवा ठप्प, जम्मूश्रीनगर महामार्ग बंद

दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. तसेच मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य करण्याचे आदेश दिले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमान धावपट्टीवरून घसरल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. मात्र, आगीचे कारण तपासण्यात येत असल्याचंही सांगितलं जात आहे.

दरम्यान, हे विमान थायलंडमधील बँकॉक येथून निघाले होते. पण दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग होत असताना बोईंग ७३७-८०० जेट हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि भीषण अपघात झाला. या विमानाचे लँडिंगचे गियर अडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे विमान लँडिंग होत असताना पायलटने विमान सुरक्षित लँडिंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, विमान लँडिंग करत असताना विमानतळावरील एका काँक्रीटच्या कुंपणाला धडकल्याने विमानाचा स्फोट झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korea plane crash news big accident in south korea 28 killed in explosion while loading plane gkt