South Korea Plane Crash Video : दक्षिण कोरियामध्ये रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात एकूण १८१ प्रवाशांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुआन (Muan) आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना विमान क्रॅश झाल्याने ही भीषण दुर्घटना घडली. १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्सना घेऊन बँकॉकहून आलेले हे विमान जेजू एअर फ्लाइट 7C2216 सकाळी नऊच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) लँडिंग करत असताना हा अपघात घडला.
ही दुर्घटना घडली त्या प्रसंगाचा व्हिडीओ देखील स्थानिक माध्यमांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे प्रवासी विमान धावरट्टीवर वर घसरत जाताना दिसत आहे. काही वेळातच हे विमान भिंतीला धडकले आणि आगीचे लोट पसरल्याचे पाहायला मिळत आहेत. अपघात स्थळावरील या व्हिडीओमध्ये विमानाला आग लागल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या दुर्घटनेत फक्त दोन लोक – एक पुरुष आणि एक महिला हेच जिवंत सापडले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बचावलेले प्रवासी हे थाई आहेत तर उरलेले सर्व प्रवाशी हे दक्षिण कोरियाचे असल्याचे सांगितले जात आहे.
दक्षिण कोरियाची नॅशनल फायर एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी घटनास्थळी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ३२ अग्निशामक ट्रक आणि अनेक हेलिकॉप्टर्स तैनात केले आहेत. या दुर्घटनेनंतर मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत.
विमान अपघात कसा झाला?
विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने विमानाचे क्रॅश लँडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसर्या प्रयत्नादरम्यान हा अपघात झाला. धावपट्टी संपेपर्यंत विमानाची गती कमी करण्यात यश आले नाही त्यामुळे विमानतळाच्या टोकाला असलेल्या भिंतीवर विमान आदळले आणि त्याने पेट घेतला असेही त्यांनी सांगितले.
मात्र स्थानिक अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी पक्ष्यांची धडक बसल्याने आणि प्रतिकूल हवामान हे या अपघाताचे कारण असल्याचे सांगितले. या अपघाताचे कारण पक्षांची धडक आणि खराब हवामान असावे असा अंदाज आहे. पण नेमके कारण काय होते हे चौकशीनंतर जाहीर केले जाईल”, अशी माहिती मुआन फायर स्टेशनचे प्रमुख ली, जेऑंग-ह्यून यांनी दिल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. मात्र या दुर्घटनेबद्दल अधिकृत माहिती मिळणे अद्याप बाकी आहे.
हेही वाचा>> Azerbaijan Plane Crash : अझरबैजानचे विमान पाडल्याबद्दल पुतिन यांनी मागितली माफी, ३८ लोकांचा झाला होता मृत्यू
गेल्या आठवड्यात अझरबैजान एअरलाइन्सचे विमान कझाकिस्तानच्या अकताउ येथे कोसळले होते, ज्यामध्ये ६७ पेकी ३८ जणांचा मृत्यू झाला होता तर इतर प्रवासी जखमी झाले होते.