एपी, सोल : दक्षिण कोरियाच्या हवाई हद्दीत उत्तर कोरियाच्या ड्रोनने कथितरित्या घुसखोरी केल्यानंतर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने शनिवारी पुन्हा तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले. उत्तर कोरियाने आपल्या पूर्व सागरी हद्दीत ही तीन कमी पल्ल्याची ‘बॅलिस्टिक’ क्षेपणास्त्रे डागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  आदल्या दिवशी शुक्रवारी दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या हालचाली टिपण्याची क्षमता वाढावी म्हणून घन इंधन उपग्रह प्रक्षेपक (रॉकेट) प्रक्षेपित केले. याद्वारे हेरगिरीसाठी उपग्रह प्रक्षेपणाची दक्षिण कोरियाची योजना आहे. या आठवडय़ाच्या प्रारंभी उत्तर कोरियाची पाच ‘ड्रोन’ दक्षिण कोरियाच्या हद्दीत आली होती, असा आरोप दक्षिण कोरियाने केला. पाच वर्षांत प्रथमच असे झाल्याने दोन्ही देशांतील तणावात भर पडली. प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियानेही आपली ‘ड्रोन’ उत्तर कोरियाच्या दिशेने पाठवली होती.

दक्षिण कोरियाच्या संयुक्त संरक्षण दल प्रमुखांनी एका निवेदनात नमूद केले आहे, की शनिवारी सकाळी उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगच्या दक्षिणेकडील भागातून तीन क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण करण्यात आले. ही क्षेपणास्त्रे सुमारे ३५० किलोमीटर (२२० मैल) अंतर पार करून कोरिया व जपानमधील सागरी क्षेत्रात कोसळली. या क्षेपणास्त्रांचा अंदाजे पल्ला पाहता, दक्षिण कोरिया डोळय़ांसमोर ठेवूनच ही चाचणी केली गेली.

त्यांनी या प्रक्षेपणाला चिथावणीखोर गंभीर कृत्य म्हणून संबोधले. दक्षिण कोरिया अमेरिकेशी समन्वय साधून उत्तर कोरियाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत आहे. उत्तर कोरियाच्या कोणत्याही चिथावणीला उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या भारत-प्रशांत महासागरीय ‘कमांड’ने सांगितले की हे प्रक्षेपण म्हणजे अस्थिरता निर्माण करण्यासाठी उत्तर कोरियाने राबवलेल्या बेकायदेशीर शस्त्रास्त्र कार्यक्रमाचा भाग आहे.

वर्षभरात ७० हून अधिक चाचण्या

 जपानच्या संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले, की, उत्तर कोरियाने संशयास्पद रीतीने ही क्षेपणास्त्रे डागली.  या क्षेपणास्त्र प्रक्षेपणापूर्वी उत्तर कोरियाने या वर्षी आतापर्यंत ७० हून अधिक क्षेपणास्त्र चाचण्या केल्या आहेत. यांपैकी अनेक अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्रे होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South korean airspace north korea launches three more missiles ysh
Show comments