सेऊल : दक्षिण कोरियातील विरोधी पक्षांनी बुधवारी अध्यक्ष यून युक येओल यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला. यून येओल यांनी मंगळवारी अचानक आणीबाणी जाहीर केली होती, त्यानंतर त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष ‘डेमोक्रॅटिक पार्टी’ आणि पाच लहान पक्षांनी संयुक्तपणे हा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर लवकरात लवकर शुक्रवारी मतदान होऊ शकते.
हेही वाचा >>> लोकसभेत रेल्वे (सुधारणा) विधेयक सादर; खासगीकरण न करण्याचे विरोधकांची मागणी
अध्यक्षांविरोधातील महाभियोग यशस्वी होण्यासाटी पार्लमेंटच्या दोन-तृतियांश सदस्यांनी ठरावाला पाठिंबा देणे आवश्यक आहे. त्याशिवाय घटनात्मक न्यायालयाच्या नऊ सदस्यांपैकी किमान सहा सदस्यांचा ठरावाच्या बाजूने कौल मिळणे गरजेचे आहे. ‘नॅशनल असेंब्ली’चे ३०० सदस्य आहेत. त्यापैकी १९० जणांनी मंगळवारी आणीबाणीविरोधातील ठरावाच्या बाजूने मतदान केले होते.
हेही वाचा >>> संभल’वरून आरोपांची चिखलफेक; राहुल गांधींचा ताफा गाझीपूर वेशीवर रोखला
मंगळवारच्या घडामोडींनंतर यून यांचे वरिष्ठ धोरण सल्लागार आणि संरक्षणमंत्री किम याँग हुयान यांनी राजीनामा देऊ केला आहे. किम हुयान यांनीच यून येओल यांच्याकडे आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली असा आरोप करत ‘डेमोक्रॅटिक पार्टी’ने त्यांच्याविरोधातही महाभियोगाचा स्वतंत्र प्रस्ताव दिला आहे. यून येओल यांनी मंगळवारी अचानक मार्शल लॉ लागू केल्यानंतर पार्लमेंटने काही तासांमध्येच त्याविरोधात ठराव करून अध्यक्षांना आणीबाणी मागे घेण्यास भाग पाडले.
© The Indian Express (P) Ltd