अमेरिका, रशिया व इटली या देशांच्या अंतराळवीरांना घेऊन सोयूझ कुपी यशस्वीरीत्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पोहोचली आहे. अंतराळवीरांचा नवीन चमू हा सहा महिने अंतराळ स्थानकात राहून प्रयोग करणार आहे. सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी ही सोयूझ कुपी तेथे जोडली गेली. कझाकस्थानातील बैकोनूर अवकाशतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या सहा तासांत ही कुपी अंतराळ स्थानकापर्यंत पोहोचली. नासा टीव्हीवर त्याचे थेट प्रक्षेपणही दाखवण्यात आले असून त्यात रात्रीच्या काळोखात सोयूझ यान झेपावताना दिसत होते. अवघ्या चार मिनिटांतच असे सांगण्यात आले की, सोयूझ ताशी ७५०० किलोमीटर वेगाने प्रवास करीत आहे. या कुपीतून नासाचे कॅरेन नायबर्ग, रशियाचे फ्योदोर युरचिखिन व इटलीचे ल्युका पारमिटानो हे अंतराळ स्थानकात गेले आहे.
अंतराळ स्थानकात पोहोचण्यापूर्वी त्यांनी चार वेळा यानातून पृथ्वीप्रदक्षिणा केली. अंतराळ स्थानक व कुपी यातील दाब समपातळीवर आल्यानंतर अंतराळवीरांना स्थानकात प्रवेश करणे शक्य झाले. नासाचे ख्रिस कॅसिडी, रशियाचे अ‍ॅलेक्झांडर मिसुरकिन व स्टेशन कमांडर पावेल विनोग्राडोव्ह यांनी या अंतराळवीरांचे स्वागत केले. ते मार्चपासून अंतराळ स्थानकातच आहेत. युरचिखिन यांनी तीन वेळा अंतराळ उड्डाण केलेले आहे, तर पारमिटानो यांची ही पहिलीच अंतराळवारी आहे. नायबर्ग हे २००८ मध्ये अवकाश स्थानकात दोन आठवडे राहून आलेले आहेत. आता गेलेले अंतराळवीर चार स्पेस वॉक करणार असून इटलीच्या अंतराळवीराचा पहिलाच स्पेस वॉक असणार आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे सर्वात मोठे वास्तव्य केंद्र असून ते पृथ्वीवरून नुसत्या डोळ्यांनीही अनेकदा दिसते. अमेरिका, रशिया, कॅनडा, जपान व युरोपीय अंतराळ संस्था यांनी त्यात अनेक मोडय़ुल बांधले  आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा