दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८ जागा लढणार; मोदी-शहांची झोप उडाल्याची टीका

एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष (सप व बसप) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आहेत. त्यांच्या आघाडीत काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नाही. हे दोन्ही पक्ष प्रत्येकी ३८ जागा लढविणार आहेत. अमेठी व रायबरेली मतदारसंघात ते उमेदवार देणार नाहीत. तेथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते मतदारसंघ आहेत. त्याशिवाय आणखी दोन जागा त्यांनी इतर लहान पक्षांना सोडल्या आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत.

या आघाडीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांची झोप उडणार आहे असा दावा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला. आमच्या आघाडीने लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत केले होते. आताही लोकसभा निवडणुकीत भाजपला नमवू असे मायावती यांनी फुलपूर, गोरखपूर व कैराना मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील भाजपच्या पराभवाचा संदर्भ देत सांगितले. ही आघाडी दीर्घकाळ टिकेल, अगदी लोकसभा निवडणुकांनंतर, विधानसभा निवडणुकीतही आम्ही एकत्र राहू असे मायावतींनी सांगितले. काँग्रेसने देशात अनेक वर्षे सत्ता गाजवली असून दारिद्रय़, बेरोजगारी व भ्रष्टाचार त्यांच्या काळात वाढतच गेला. त्यांच्या काळात संरक्षण खरेदीतही घोटाळे  झाले. काँग्रेसला आघाडीत घेतले असते तर काँग्रेसचा हा भूतकाळ आम्हाला आडवा आला असता असे मायावती यांनी स्पष्ट केले. तसेच पूर्वीचा अनुभव पाहता आमची मते काँग्रेसला मिळाली आहेत, पण काँग्रेसची मते आम्हाला मिळाली नाहीत. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष यांच्यात मतांचे हस्तांतर शक्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ७१ जागा मिळाल्या होत्या. त्यााशिवाय मित्र पक्ष अपना दलास दोन जागा मिळवता आल्या. समाजवादी पक्षाला पाच तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या. बसपला खातेही उघडता आले नव्हते.

मोदींशी लढणे कठीण -रविशंकर प्रसाद

भाजपने या आघाडीवर टीका केली आहे. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष हे त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यांना देश किंवा उत्तर प्रदेशातील जनतेशी काही कर्तव्य नाही. या आघाडीचा लोकसभा निवडणूक निकालांवर फारसा परिणाम होणार नाही. ते एकटय़ाने मोदींशी लढू शकत नाहीत म्हणून एकत्र आले आहेत असा टोला भाजप नेते केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.

ममतांकडून स्वागत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहुजन समाज पक्ष व समाजवादी पक्ष यांच्या आघाडीचे स्वागत केले आहे. या युतीचे मी स्वागतच करते असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

पंतप्रधान उत्तर प्रदेशचाच – अखिलेश

मायावती या पंतप्रधानपदाच्या उमेदवार असतील काय, यावर अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचा पंतप्रधान होईल असे उत्तर दिले. पण कोण होईल हे त्यांनी सांगण्याचे टाळले.

झाले गेले विसरून एकत्र – मायावती

१९९५ मध्ये लखनौ अतिथीगृहात मायावती यांना समाजवादी पक्षाचे समर्थक व गुंडांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळचे उदाहरण देऊन भाजप फूट पाडण्याचा प्रयत्न करील यावर मायावती म्हणाल्या की, भाजपला सरकार स्थापन करता येऊ नये यासाठी झाले गेले विसरून आम्ही देशहितासाठी एकत्र आलो आहोत.

Story img Loader