Akhilesh Yadav claims Shivling: उत्तर प्रदेशमध्ये सध्या मशिदीचे खोदाकाम आणि मंदिरे शोधण्याची प्रकरणे वाढू लागली आहेत. संभलचे प्रकरण चर्चेत आल्यानंतर आता ठिकठिकाणी सर्वेक्षण करण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. तसेच अनेक ठिकाणी मशिदीखाली शिवलिंग असल्याचे दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, खासदार अखिलेश यादव यांनी वक्तव्य केले आहे. ज्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. अखिलेश यादव यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शासकीय निवासस्थानाखालीही शिवलिंग आहे. त्यामुळे तिथेही खोदकाम करण्यात यावे.
अखिलेश यादव यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाखालीही शिवलिंग असल्याची आमची माहिती आहे. तर तिथेही खोदकाम केले जावे. तसेच लोकांचे लक्ष वळविण्यासाठी भाजपाकडून मुद्दामहून वेगवेगळे विषय पुढे केले जात असतात, असाही आरोप यादव यांनी केला. ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे, भाजपाच्या हातात विकासाची नाही तर विनाशाची रेषा आहे, असेही ते म्हणाले.
भाजपाकडून प्रत्युत्तर
अखिलेश यादव यांच्या टीकेनंतर आता भाजपाचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. संभलमध्ये खोदकाम केल्याचे अखिलेश यादव यांना वाईट वाटत आहे. २०१३ साली मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून १००० टन सोने काढण्यासाठी उत्खनन केले. त्यांना सोने काढण्यात रस आहे, पण शिवलिंगाचे उत्खनन होत असेल तर त्यांना अडचण वाटते. म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचे खोदकाम करण्याची मागणी केली.
हे ही वाचा >> Sambhal mosque dispute: संभल विषयीचे ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात? मंदिर खरंच बाबराने नष्ट केले होते का?
भाजपाचे दुसरे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, समाजवादी पक्षाच्या नेत्याचे विधान अतिशय लाजिरवाणे असून त्यांनी राजकीय टीकाटिप्पणी करण्यासाठी आणि स्वतःच्या मतपेटीला गोंजारण्यासाठी शिवलिंगाचा अवमान केला आहे.
अखिलेश यादव यांनी याआधी संभलमधील पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणावर टीका केली गेली होती. “जर हे लोक दिवसेंदिवस असेच खोदकाम करत राहिले, तर एक दिवस त्यांच्या स्वतःच्या सरकारचाच खड्डा खणला जाईल”, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला होता.