वैद्यकीय घोटाळ्यातील आरोपी असलेले बसपाचे माजी मंत्री बाबू सिंग कुशवाह यांच्या पत्नी आणि भावाला समाजवादी पक्षाने शनिवारी पक्षात प्रवेश दिला आहे. आरोग्य योजनेतील घोटाळ्यावरून सपाने खुशवाह यांच्यावर जोरदार हल्ला केला होता.
कुशवाह यांच्या पत्नी शिवकन्या खुशवाह आणि भाऊ शिवशरण कुशवाह यांनी आपल्या समर्थकांसह पक्षात प्रवेश केल्याची घोषणा सपाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली.
या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे लोकसभा निवडणुकीत सपाला आणखी बळ मिळेल, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेत कोटय़वधींचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून बाबू सिंग कुशवाह सध्या तुरुंगवास भोगत आहेत.
दरम्यान, कुशवाह यांच्या कुटुंबीयांना पक्षात घेतल्याबद्दल  बसपासह अन्य विरोधी पक्षांनीही सपावर टीका केली आहे. समाजवादी पक्ष भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देत असल्याचा आरोप बसपाने केला आहे. सत्तेत आल्यानंतर घोटाळा प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा करणाऱ्या सपाने आता कुशवाह यांच्या कुटुंबीयांनाच पक्षात घेतल्याची टीका बसपाचे नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी केली