समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण करण भोवलं आहे. आझम खान यांना द्वेषपूर्ण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आता उत्तर प्रदेशमधील रामपूर न्यायालयाने आझम खान यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
शिक्षा ठोठावल्यानंतर आझन खान यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, जामीनानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. आझम खान यांची विधानसभा सदस्यता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, याप्रकरणी आझम खान वरील न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
यानंतर बोलताना आझम खान म्हणाले, “मला न्यायाची खात्री आहे. माझ्यासमोर अन्य मार्ग खुले असून, ही पहिली पायरी आहे. माझे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिलं आहे. जीव गेला तरी आम्ही लढत राहू.”
काय आहे प्रकरण?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आझम खान द्वेषपूर्ण भाषण केलं होतं. त्याप्रकरणी भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी रामपूर न्यायालयाने आझम खान यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.