याकूब मेमनची पत्नी राहीन मेमन हिला खासदार बनविण्याची मागणी करणाऱ्या फारूख घोसी यांची शनिवारी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. फारूख घोसी हे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील उपाध्यक्ष होते. त्यांनी शुक्रवारी पक्षाचे प्रमुख नेते मुलायम सिंह यादव यांच्याकडे पत्र लिहून याकूबच्या पत्नीला खासदार करण्यात यावे, अशी मागणी केली होती. याकूब मेमनसोब त्याची पत्नी राहीनलाही १९९३ च्या मुंबईतील साखळी स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आली होती. पण कालांतराने राहीनला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. मात्र ती अनेक वर्ष तुरुंगात राहिल्य़ाने तिला अनंत यातना सहन कराव्या लागल्या. आत्तादेखील ती असहाय्य अवस्थेत आहे, त्यामुळे तिला समाजवादी पक्षाने खासदार बनवावे, असे फारूख यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. घोसींच्या या विधानानंतर समाजवादी पक्षावर टीकेची प्रचंड झोड उठली होती. त्यामुळे शनिवारी त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, टीकेची झोड उठल्यानंतर घोसी यांनी सारवासारव करताना मी ते पत्र घाईत लिहले होते आणि ते लिहूनही पूर्ण झाले नसल्याचे सांगितले. पत्र लिहताना माझ्या डोक्यात अनेक विचार होते. मात्र, आता मला माझी चूक लक्षात आली असून मी ते पत्र मागे घेत असल्याचे फारूख घोसी यांनी ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

Story img Loader